वाई : करोनामुळे प्रशासनाने घातलेला बंदी आदेश झुगारत बावधन (ता. वाई) येथे झालेल्या बगाड यात्रेप्रकरणी शनिवारी अडीच हजार लोकांवर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी आतापर्यंत ९६ लोकांना अटक करण्यात आली आहे.

करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे बावधन येथील यात्रेवर निर्बंध लादण्यात आलेले होते. मात्र तरीही शुक्रवारी गावात हजारोंच्या उपस्थितीत बगाड मिरवणूक काढण्यात आली. याची प्रशासनाने गंभीर दखल घेत कालच तब्बल ९६ लोकांना अटक करण्यात आली तर आज गावातील तब्बल अडीच हजार लोकांवर गुन्हा दाखल झाला आहे. वाईचे तहसीलदार रणजित भोसले यांनी वाई पोलीस ठाण्यात या बाबत तक्रार दाखल केली असून त्यानुसार हा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेतील ११० लोकांची नावे निष्पन्न झाली आहेत. यातील ९६ लोकांना अटक केली आहे. त्यांना रात्री न्यायालयाने पाच हजार रुपयांच्या वैयक्तिक जामिनावर सोडण्यात आले आहे.  दरम्यान, गुन्हे दाखल झालेले आणि या प्रकरणातील प्रमुख आयोजकांचा पोलिसांकडून आजही शोध सुरू होता. यामुळे गावाला सध्या पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी आज पुन्हा वाईला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

Story img Loader