एका महिलेचा बेकायदा गर्भपात करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी चौकशीअंती शहरातील सिटी हॉस्पिटलच्या संचालक मंडळासह डॉ. संदेश कादे, डॉ. एस. एस. अहिरसंग, डॉ. रवींद्र पाठक तसेच गर्भपात केलेल्या मातेसह तिचा पती आणि वडिलांविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सोलापूर महानगरपालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. श्रीकांत वैद्य यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार या गुन्ह्य़ाची पाश्र्वभूमी अशी की, राजश्री मुकेश फत्तेवाले (२२, रा. लोधी गल्ली, लष्कर, सोलापूर) ही गरोदर महिला सात रस्ता येथील सनराईस हॉस्पिटलमध्ये ताप आल्यामुळे उपचारांसाठी दाखल झाली होती. परंतु प्रकृती गंभीर झाल्याने तिला आवश्यक उपचारांकरिता सिटी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. त्या ठिकाणी तिचा बेकायदा गर्भपात करण्यात आला. शस्त्रक्रियेनंतर भ्रूणाचा काढलेला भाग न्यायवैद्यकीय तपासणीसाठी संबंधित यंत्रणेकडे पाठविणे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. गरोदर रुग्ण महिलेची संमती न घेता गर्भपात केल्यानंतर पुरावा नष्ट केला गेला.
एका ज्येष्ठ स्त्री रोग तज्ज्ञाने दिलेल्या माहितीनुसार महापालिकेच्या कुटुंब कल्याण केंद्राच्या डॉ. वैशाली शिरशेट्टी यांनी प्राथमिक तपास करून डॉ. संदेश कादे यांना नोटीस बजावली होती. त्यावर देण्यात आलेले उत्तर असमाधानकारक होते. तर महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. वैद्य यांनी केलेल्या ‘इनकॅमेरा’ चौकशीत सनराईस हॉस्पिटल, सिटी हॉस्पिटल, प्रिझम डायग्नोस्टिक सेंटर व डॉ. पोतदार लॅबरोटरीतील संबंधित कागदपत्रे ताब्यात घेऊन निष्कर्ष काढला. यात बेकायदा गर्भपात झाल्याचे दिसून आले. सिटी हॉस्पिटलला मान्यता नसताना तेथे गर्भपात केला गेला. डॉ. कादे यांच्यासह भूलतज्ज्ञ डॉ. एस. एल. अहिरसंग व डॉ. रवींद्र पाठक यांनी हे कृत्य केले असता त्यास सिटी हॉस्पिटलच्या संचालक मंडळाने संमती दिली. रुग्ण महिलेला दोन मुलीनंतर तिसऱ्या गरोदरपणात गर्भपात करण्यात आला. यात सदर रुग्ण महिलेसह तिचा पती मुकेश फत्तेवाले व वडील कालूसिंग बाबावाले यांच्यावर ठपका ठेवण्यात आला.

Story img Loader