लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सातारा : सातारा कारागृहातून संशयित आरोपीला जामीन मिळाल्यानंतर त्याला घेऊन जाण्यासाठी आलेल्या जमावाने कारागृहासमोर व शहरात घोषणा देत गोंधळ केला. त्याची चित्रफीत समाज माध्यमावर प्रसारित करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल सातारा शहर पोलीस ठाण्यात कोरेगाव येथील नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निखिल बर्गे, अक्षय बर्गे, राधेश्याम कदम, राज पवार व अनोळखी पाच अशा एकूण नऊ जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचारी सचिन रिटे यांनी तक्रार दिली आहे.

अथर्व पवार (रा. कोरेगाव) या संशयित आरोपीला सातारा जिल्हा कारागृहातून दि. १८ जानेवारी रोजी जामीन मिळाला. कारागृहातून तो शहर पोलीस ठाण्यासमोर आला. यावेळी संशयित जमाव त्याच्या स्वागताला आला होता. यावेळी त्यांनी बेकायदा जमाव जमवत दहशत निर्माण करण्यासाठी समाजात द्वेष भावना निर्माण होईल, अशा घोषणा दिल्या. यानंतर सर्व संशयित सहा दुचाकीवरून कोरेगावच्या दिशेने निघून गेले. या संपूर्ण घटनेची चित्रफीत संशयितांनी समाज माध्यमावर प्रसारित केली. कारागृहातून सुटल्यानंतर चित्रफीत समाज माध्यमांवर प्रसारित केल्याची माहिती पोलिसांना दि. २ फेब्रुवारी रोजी समजल्यावर त्यांनी ती चित्रफीत पाहून संशयितांची माहिती घेतली. यानंतर पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल केला.

गुन्हे करणारे व त्यांचे समर्थन करून समाज माध्यमावर चित्रफीत प्रसारित करणाऱ्यांवर पोलीस कायद्यानुसार गुन्हे दाखल करणार आहोत. संशयीतांवर कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करणार आहोत. जिल्हा कारागृहामध्ये जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील कैदी आहेत. पोलीस ठाण्यासमोरचे तसेच सातारा शहरात त्याचे चित्रीकरण प्रसारित झाले तर ते पाहून पोलीस स्वतः गुन्हे दाखल करणार आहेत, असे सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी सांगितले.