पैठण तालुक्यातील चितेगाव येथील जमीन व्यवहारात पैठणचे तत्कालीन तहसीलदार राजीव शिंदे व तलाठी टी. व्ही. सानप यांच्या विरोधात खोटी कागदपत्रे बनवून अधिकाराचा गैरवापर केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकाशक व लेखक बाबा भांड व इतरांची पाच एकर जमीन आर्थिक लाभासाठी सय्यद हबीब सय्यद इमाम यांच्या नावे करताना खोटी कागदपत्रे तयार केल्याची तक्रार भांड यांनी केली होती. कागदपत्रे तपासल्यानंतर पैठण पोलीस ठाण्याचे प्रशिक्षणार्थी अधिकारी दीक्षित गेडाम यांनी गुन्हा दाखल केला.
पैठण येथे बाबा भांड, आशा भांड, साकेत भांड, किरण प्रभाकर देशमुख, राजाभाऊ जगताप व दत्तात्रय जगताप यांच्या नावे गट क्र. ६१ मध्ये १९ एकर २७ गुंठे जमीन आहे. तेच या जमिनीचे मालक व ताबेदार आहेत. २०११मध्ये सय्यद हबीब सय्यद इमाम व इतरांनी पैठणच्या तहसीलदारासमोर या जमिनीचा वाद असल्याचे सांगत तक्रार दाखल केली. पैठणचे तहसीलदार शिंदे यांनी युक्तिवाद ऐकल्यानंतर निर्णयासाठी प्रकरण राखून ठेवले. २१ सप्टेंबर २०१२ रोजी निर्णयासाठी राखून ठेवलेले हे प्रकरण १५ महिने धूळखात पडले होते.
९ जानेवारी २०१४ रोजी तहसीलदार शिंदे यांची बीड जिल्ह्य़ातील आष्टी येथे बदली झाली. त्यांनी कार्यभार सोडला. यानंतर ३ फेब्रुवारीला प्रतिवादी सय्यद हबीब यांच्या वकिलाची कॅव्हेट नोटीस बाबा भांड यांना मिळाली. त्यामुळे जमीन प्रकरणात तत्कालीन तहसीलदार शिंदे यांनी निकाल दिला असावा, असे स्पष्ट झाले. या निकालाची प्रमाणित नक्कल मिळावी, म्हणून बाबा भांड व किरण देशमुख यांनी पैठण तहसीलमध्ये कागदपत्रांची मागणी केली. मात्र, ही संचिकाच तहसीलदारांनी कार्यालयात ठेवली नसल्याचे त्यांच्या सहकाऱ्यांनी लेखी कळविले.
जमिनीचा हा निर्णय घेण्यापूर्वी तलाठी टी. व्ही. सानप यांनी तहसीलदारांकडे अर्ज करताना सय्यद हबीब यांची बनावट सही केल्याचा आरोप बाबा भांड यांनी केला. सानप यांनी अर्ज लिहिला. या अर्जावर आधारित खोटा पंचनामा केला. या पंचनाम्याचा आधार घेऊन जमीन प्रकरणात तहसीलदारांनीही निर्णय दिला. या खोटय़ा व बनावट कागदपत्राची तहसील कार्यालयात नोंद नाही. बनविलेली कागदपत्रे खोटी असल्याचा अहवाल बाबा भांड यांनी हस्ताक्षर तज्ज्ञांकडून मिळवला. नियमांचे उल्लंघन करून जमीन हबीब यांच्या नावे करून देण्याचा गुन्हा केल्याचा आरोप भांड यांनी ठेवला आहे.
या प्रकरणी जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, तसेच पोलीस अधीक्षकांकडेही भांड यांनी तक्रारी केल्या. त्यानुसार पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तलाठय़ाची करामत लक्षात घेऊन भांड यांनी सानप यांच्या काळातील चितेगावमधील अन्य फेरफाराच्या नोंदी माहितीच्या अधिकारात मागवून घेतल्या. या कागदपत्रांच्या आधारे ७७२ फेरफारांपैकी ५६९ फेर नियमांचा भंग करून नोंदविले असल्याची तक्रारही भांड यांनी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांकडे केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा