सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून साखर तारण ठेऊन ६१ कोटी रुपये कर्ज घेतल्यानंतर तारण साखरेची परस्पर विक्री करून बँकेला ४६ कोटी ३७ लाख रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी अक्कलकोट तालुक्यातील श्री स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या तत्कालीन संचालक मंडळाविरुद्ध अखरे दहा वर्षांनी गुन्हा दाखल झाला आहे. यात कारखान्याचे अध्यक्ष, भाजपाचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील आणि संचालक असलेले शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे माजी आमदार शिवशरण पाटील बिराजदार यांच्यासह २४ जणांना आरोपी करण्यात आले आहे.

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २३८ कोटींच्या आर्थिक नुकसानीची जबाबदारी निश्चित करून बँकेच्या तत्कालीन संचालक व अधिकाऱ्यांसह ३२ जणांविरोधात व्याज व दंडासह नुकसान भरपाई वसूल करण्याची कारवाई सुरू झाली असून यात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व त्यांचे पुत्र भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, बार्शीचे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आमदार दिलीप सोपल, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे माजी आमदार राजन पाटील-अनगरकर, माढ्याचे माजी आमदार बबनराव शिंदे व त्यांचे बंधू माजी आमदार संजय शिंदे आदींचा समावेश आहे. या कारवाईमुळे सोलापूर जिल्ह्यातील सहकार आणि राजकारण ढवळून निघत असताना त्या पाठोपाठ आता जिल्हा बँकेकडून कर्ज घेऊन पुन्हा फसवणूक करणाऱ्या साखर कारखान्यांवरही फौजदारी कारवाईचे सत्र आरंभण्यात आले आहे. अलीकडेच आमदार दिलीप सोपल यांच्याशी संबंधित बार्शी तालुक्यातील आर्यन साखर कारखान्याविरुद्ध फौजदारी कारवाई झाली असून, त्या पाठोपाठ आता अक्कलकोटच्या स्वामी समर्थ साखर कारखान्यावरही फौजदारी कारवाई झाली आहे.

हेही वाचा >>>डोंबिवलीत तरूणीचा पाठलाग करणाऱ्या इसमाला नागरिकांचा चोप

अक्कलकोट तालुक्यातील दहिटणे येथील श्री स्वामी समर्थ साखर कारखान्याने २०१४-१५ साली जिल्हा बँकेकडून साखर तारण ठेवून ६१ कोटींचे कर्ज घेतले होते. नंतर मात्र तारण असलेल्या साखरेची परस्पर विक्री केली आणि त्यातून आलेली ४६ कोटी ३७ लाख रुपये एवढी रक्कम बँकेत भरणा न करता स्वतःच्या फायद्यासाठी परस्पर हडप करण्यात आली, असे बँकेच्या अक्कलकोट शाखेतील अधिकारी लक्ष्मीपुत्र होदे यांनी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

फिर्यादीनुसार कारखान्याचे अध्यक्ष, भाजपचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील व उपाध्यक्ष काशिनाथ धरमशेट्टी यांच्यासह संचालक, शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार शिवशरण पाटील- बिराजदार, बसलिंगप्पा खेडगी, स्वामीराव पाटील, यशवंत धोंगडे, संजीव सिद्रामप्पा पाटील, महेश लक्ष्मीपुत्र पाटील, कार्यकारी संचालक चंद्रकांत मिसाळ आदी २४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. यातील काहीजण मृत्यू पावले आहेत.

दरम्यान, यासंदर्भात माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांचे पुत्र संजीव पाटील यांच्यावरही कारवाई झाली असून, त्यांनी ही कारवाई म्हणजे राजकारण झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.

Story img Loader