बुधवारी दिवसभरात गोळीबाराच्या तीन घटनांनी पुणे शहर हादरले असून संध्याकाळी रेल्वे स्टेशनवर एका आरोपीने थेट पोलीस निरीक्षकावरच गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात पोलीस निरीक्षक गजानन पवार हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या पोटात दोन गोळ्या लागल्या आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पुण्यातील चंदननगरमधील आनंद पार्क परिसरात राहणाऱ्या एकता भाटी यांच्यावर बुधवारी सकाळी राहत्या घरी हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. या गोळीबारात एकता भाटी यांचा मृत्यू झाला होता. एकता यांच्यावर गोळीबार करणारा आरोपी हा झेलम एक्स्प्रेसने फरार होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानुसार पोलीस त्यांना पकडण्यासाठी रेल्वे स्टेशनवर पोहोचले. पोलिसांना पाहताच आरोपीने पोलीस निरीक्षक गजानन पवार यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. यातील दोन गोळ्या त्यांच्या पोटात लागल्या आहे. संध्याकाळी सव्वा पाचच्या सुमारास ही घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. तर पवार यांना पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात अले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. घटना स्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट दिली

दरम्यान, चंदननगर आणि पुणे रेल्वे स्टेशनसह येवलेवाडी भागातही बुधवारी गोळीबाराची घटना घडली होती. गणेश ज्वेलर्सवर दरोडा टाकण्यासाठी आलेल्या चार अज्ञातांनी दुकानातील कामगारावर गोळीबार करुन पळ काढला होता.