कुख्यात गुंड अरूण गवळी संदर्भातली एक फाईल गहाळ झाल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राइम अॅक्ट लागू करण्यासंदर्भातली फाईल गहाळ झाल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी मुंबई सत्र न्यायालयाला दिली. शिवसेना नेते आणि नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणात अरूण गवळी नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगतो आहे. अरूण गवळी सध्या जामिनावर बाहेर आहे. आर्थिक लाभ, खंडणी आणि २००५ मध्ये मुंबई, ठाणे, कल्याण येथील मालमत्ता हडप करण्यासाठी त्याने काहींना धमकावल्याचा आरोप त्याच्यावर आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोर्टाने मागच्या महिन्यात केली होती विचारणा

खंडणी प्रकरणात उलट तपासणीसाठी अरूण गवळीच्या वकिलांना कागदपत्रं मागितली होती. विशेष सरकारी वकिलांनी २०१३ मध्ये मुंबईत पूर आला असताना जी फाईल ठेवली होती ती सापडत नसल्याचं म्हटलं होतं. न्यायालयाने यावरुन गेल्याच महिन्यात पोलिसांना खडे बोल सुनावले होते. आधार नसलेली विधानं आम्ही मान्य करणार नाही असंही कोर्टाने म्हटलं होतं. तसंच दहा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या खटल्याला आणखी किती विलंब करायचा? असाही सवाल न्यायालयाने विचारला होता. कागदपत्रं सादर करण्यात किती वेळ लागेल ती मुदत सांगा असाही प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला होता. आता या प्रकरणातली महत्त्वाची फाईलच गहाळ झाली अशी माहिती देण्यात आली आहे. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिलं आहे.

हे पण वाचा- अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्या सुटकेबाबतच्या निर्णयाला ‘सर्वोच्च’ न्यायालयाची स्थगिती…

गवळी टोळीकडून बिल्डरला २००५ मध्ये धमक्या

मुंबईतील एका बिल्डरला २००५ मध्ये गवळीच्या टोळीकडून धमकीचे फोन आले होते. त्यात राम श्याम को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीत पुनर्विकास प्रकल्प सुरू ठेवण्यासाठी ५० लाख रूपयांची मागणी करण्यात आली होती. त्यासह बिल्डरला ठार मारण्याच्या धमक्या देऊन गवळीचे घर असलेल्या दगडी चाळीत जाण्यास सांगितलं होतं. नंतर गवळी आणि त्याच्या साथीदारांवर खंडणी, धमकीसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.यानंतर अरुण गवळी आणि त्याच्या साथीदारांवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली होती.

काय आहे कमलाकार जामसंडेकर हत्या प्रकरण?

कमलाकार जामसंडेकर यांची हत्या झाली होती. या प्रकरणी अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. २ मार्च २००७ या दिवशी संध्याकाळी पावणेपाचला मुंबईतल्या घाटकोपरमध्ये शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर दिवसभरातली कामं संपवून त्यांच्या घरात टीव्ही पाहात होते. असल्फा व्हिलेजच्या रुमानी मंजिल चाळीत ते राहात होते. कमलाकार जामसंडेकर यांनी त्यावेळी अखिल भारतीय सेनेचे उमेदवार अजित राणेंचा ३६७ मतांनी पराभव केला होता. कमलाकार जामसंडेकर यांच्या पत्नी कोमल या कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. जामसंडेकर यांची भाची मनाली हिरे स्वयंपाक घरात काम करत होती. इतक्यात घराबाहेर दोन मोटरसायकल येऊन थांबल्या होत्या. त्यावरुन चार लोक उतरले. त्यातला एकजण हा जामसंडेकर यांच्या घराकडे आला आणि त्यांच्या घरात शिरला. त्याने त्याच्याकडच्या बंदुकीने जामसंडेकर यांच्यावर पिस्तुलाने गोळीबार केला. हा गोळीबार अत्यंत जवळून म्हणजेच पॉईंट ब्लँक रेंजवरुन करण्यात आला. गोळीबार झालेला पाहून मनाली धावत बाहेर आली तेव्हा कमलाकार जामसंडेकर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले तिला दिसले. तिने मदतीसाठी धावा केला. जामसंडेकर यांच्यावर गोळीबार झाल्याचं कळताच गर्दी जमा झाली. त्या गर्दीचा फायदा घेऊन हल्लेखोर तिथून पळाले.

कमलाकार जामसंडेकर यांना रुग्णालयात आणण्यात आलं. मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. यानंतर पोलिसांनी हत्येचा तपास सुरु केला. मात्र पोलिसांना सुगावा लागत नव्हता. पोलीस मात्र कसून चौकशी करत होते. त्यावेळी त्यांना समजलं की या हत्येचे धागेदोरे एका आमदारापर्यंत पोहचले आहेत. अर्थातच तो होता डॉन अरुण गवळी. त्यामुळे याच प्रकरणात अरुण गवळीला अटक झाली. कमलाकार जामसंडेकर यांच्या हत्येनंतर जवळपास वर्षभराने ही बाब उघड झाली होती की ही सुपारी अरुण गवळीने दिली आहे. अरुण गवळी त्यावेळी भायखळा मतदारसंघाचा आमदार होता. मुंबई पोलिसांना जे पुरावे मिळाले त्यानुसार अरुण गवळीला कमलाकर जामसंडेकर यांची हत्या करण्यासाठी ३० लाख रुपये देण्यात आले होते. अरुण गवळीने काम होईल असा विश्वास सुपारी देणाऱ्या सदाशिव सुर्वे आणि साहेबराव भिंताडे यांना दिला होता. हे दोघे दगडी चाळीत आले होते. त्यांनी दगडी चाळीतच ३० लाख रुपये अरुण गवळीला दिले होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crime branch to court mcoca file in extortion case against arun gawli untraceable scj
Show comments