पुणे : शिवाजीनगर येथील करोना काळजी केंद्र गैरव्यवहार प्रकरणात लाईफ लाईन हाॅस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसचे संचालक सुजित पाटकर यांच्यासह चौघांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) कार्यकारी अभियंता राजू ठाणगे (वय ४७) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.या प्रकरणी लाईफ लाईन हाॅस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसचे संचालक सुजित मुकुंद पाटकर, डॉ. हेमंत रामशरण गुप्ता, संजय मदनराज शहा, राजू नंदकुमार साळुंखे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ठाणगे यांच्या फिर्यादीनुसार फसवणूक,अपहार तसेच अन्य कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांनी दिली आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनीही या गुन्ह्याविषयी माहिती दिली आहे.
लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनीला अनुभव नसताना पुणे महापालिकेच्या करोना काळजी केंद्र चालविण्याचे कंत्राट देऊन मोठा गैरव्यवहार करण्यात आला.लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनीचे संचालक सुजित पाटकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली होती.पाटकर शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय आहे.१० एप्रिल रोजी सोमय्या यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करून संबंधितांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी सोमय्या यांनी केली होती.
करोना संसर्ग काळात राज्य शासनाने जुलै २०२० मध्ये करोना काळजी केंद्र सुरू केले होते. मुंबई महापालिका आणि पुणे महापालिकेकडून करोना काळजी केंद्राची उभारणी करण्यात आली होती. शिवाजीनगरमधील करोना केंद्र चालवण्याचे कंत्राट सुजित पाटकर यांच्या लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनीला देण्यात आले. पीएमआरडीए आणि करोना कृती दलाने दिलेल्या नियमांचे उल्लंघन करण्यात आले. अनुभवी वैद्यकीय तज्ज्ञ तेथे नव्हते तसेच पुरेसा प्रशिक्षित कर्मचारी वर्ग नसल्याने आठवडाभरात करोना काळजी केंद्राच्या कामकाजाबाबत रुग्ण आणि नातेवाइकांनी तक्रारी केल्या. संबंधित कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे तीन रुग्णांचा मृत्यू झाला होता.
पुणे महापालिकेने याबाबत २ सप्टेंबर २०२० रोजी पीएमआरडीएला अहवाल पाठविला होता. लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसकडे अनुभव नसताना काम सुरू ठेवले होते. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली होती. ९ सप्टेंबर २०२० रोजी पीएमआरडीएने संबंधित कंपनीचे कंत्राट रद्द करण्याचे आदेश दिले. कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात आले होते. लाईफ लाईन मॅनेजमेंट सर्व्हिसेसने अनेक नियमांचे उल्लंघन केले तसेच रुग्णांची पुरेशी काळजी घेतली नाही. प्रशिक्षित मनुष्यबळाची वाणवा असल्याचे दिसून आले,असे ठाणगे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, “लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसविरोधात पुणे पोलिसात आयपीसी अंतर्गत ४२०, ४०६, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ५११, ३४ एफआयआर दाखल करण्यात आला आहे.”
सुजित पाटकर यांच्या कंपनीला मुंबई आणि ठाण्यातील अनेक कोविड सेंटरचे कंत्राट मिळाले होते. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी या कंत्राटातील अनियमिततेबाबत आरोप केले होते. यावरून किरीट सोमय्या यांनी पाटकर आणि त्यांच्या कंपनीविरोधात पुण्यात तक्रारही दाखल केली होती.