गडचिरोलीत नक्षलग्रस्त जंगलातून २२ किमीचा प्रवास
सरकारी अधिकाऱ्यांनी सर्वसामान्य नागरिकांची कामे वेळेत करणे, कठीण प्रसंगी त्यांच्यासाठी धाव घेणे, किंवा ते भयभीत असतील तर त्यांना धीर देणे आवश्यक असते. पण हा झाला आदर्शवाद. वास्तवात असे अधिकारी कमीच असतात. अशा अधिकाऱ्यांमध्ये गडचिरोली जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांचा समावेश करायला हवा.
नक्षलवाद्यांच्या दहशतीने भयभीत झालेल्या एटापल्ली तालुक्यातील कसनासूर आणि बोरिया गावातील नागरिकांना धीर देण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह आणि पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी २२ किलोमीटरचा पायी प्रवास केला. हा प्रवास साधासुधा नव्हता, तर घनदाट जंगलातून आणि नक्षलग्रस्त भागातून.
एक वर्षांपूर्वी नक्षलवादी आणि पोलीस यांच्यात झालेल्या चकमकीत ४० नक्षलवादी ठार झाले होते. या घटनेनंतर जिल्हय़ात नक्षलवादी चळवळीला धक्का बसला होता. परिणामी नक्षलवाद्यांनी स्थानिक आदिवासींना लक्ष्य करणे सुरू केले. नक्षलवाद्यांनी एकाच महिन्यात आठ ग्रामस्थांची हत्या केली. यातील तीन कसनासूर गावातील होते.
नक्षलवाद्यांच्या दहशतीने ग्रामस्थांनी गाव सोडले. थेट ताडगाव पोलीस ठाणे गाठले आणि तेथेच मुक्काम ठोकला. शेकडो ग्रामस्थ जवळपास आठ ते दहा दिवस ताडगाव पोलीस ठाण्यात मुक्कामी होते. दहशत कमी झाल्यावर गावकरी कसनासूरला परतले. मात्र, अजूनही त्यांच्या मनात नक्षलवाद्यांची दहशत कायम आहे. ती दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंग आणि पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी कसनासूरला भेट देण्याचे ठरवले.
घनदाट जंगलातून जाणारा रस्ता, नक्षलवाद्यांच्या हल्ल्याची भीती. अशा परिस्थितीत २२ किलोमीटरची पायपीट करीत दोन्ही अधिकाऱ्यांनी गाव गाठले. तेथे नागरिकांशी चर्चा करून त्यांना दिलासा दिला. त्यांच्या सुरक्षेबद्दल आश्वस्त केले.
नक्षलवादी आदिवासींवर अत्याचार करीत आहेत. त्यांचा बीमोड करण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचे पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी गावकऱ्यांना सांगितले. दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटीमुळे गावकऱ्यांच्या मनात त्यांच्याविषयीचा विश्वास निर्माण झाला आहे.
दोन लाखांची मदत
नक्षलवाद्यांनी हत्या केलेल्या कसनासूर येथील मालू मडावी, कन्नाडी दुमडावी आणि लालसू मासा कोळी यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपयांचे धनादेश शेखर सिंह आणि बलकवडे यांच्या हस्ते देण्यात आले.