गेल्या काही महिन्यांपासून नागापूरवाडीतील मुळा नदीपात्रात उच्छाद मांडलेल्या वाळूतस्करांना महसूल विभागाने सणसणीत चपराक दिली आहे. तब्बल ३ कोटी ४० लाख ६५ हजार रूपयांच्या गौण खनिजाची चोरी, पर्यावरणाचा ऱ्हास आणि सरकारी कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी तिघा वाळूतस्कारंसह आठ जणांविरूध्द पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी ९२ लाख रूपयांचा मुद्देमालही जप्त केला आहे. या सर्वाना न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी दिली आहे.
या गुन्ह्य़ात अटक करण्यात आलेल्यांमध्ये नितीन रमेश अडसूळ, संदीप दगडू कपाळे, अशोक शिवाजी रोहकले या स्वत:स प्रतिष्ठीत समजणाऱ्यांचा समावेश आहे. तालुक्यातील नागापूरवाडी येथील मुळा नदीपात्रात गेल्या काही महिन्यांपासून वाळूतस्करांनी मोठय़ा प्रमाणावर वाळूची चोरी केली. स्थानिक महसूल प्रशासनाकडून त्यास पाठबळ दिले जात होते. महिनाभरात तब्बल चारवेळा कारवाईचा फार्स करण्यात आला, परंतु पुढील कारवाई काहीच होत नसल्याने अखेर जिल्हा प्रशासनकडून कारवाई करण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सदानंद जाधव यांनी महाराष्ट्र दिनी स्वत:च पथकाचे नेतृत्व करून सकाळी नऊ वाजताच नदीपात्र गाठले. तेथे दोन पोकलेन, एक जेसीबी तसेच दोन मोटारी ताब्यात घेतल्या होत्या.
महसूल अथवा पोलिस प्रशासनाने कारवाई केल्यानंतर दमबाजी करून यांत्रिक उपकरणे तसेच वाहने पळवून नेण्याची या तस्करांची नेहमीचीच सवय असलेल्या माफियांनी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या पथकावरही दमबाजी करून सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र जाधव यांनी ठाम भूमिका घेतल्याने तस्करांची मात्रा चालली नाही. परंतु ही यांत्रिक उपकरणे हे पथक ताब्यात घेऊ शकले नाही. या पथकाने तस्करांनी उपसलेल्या वाळूचा पंचनामा करून घेतलेल्या जबाबाप्रमाणे कारवाई करण्यात आली. सुरूवातीस दंडात्मक रक्कम भरण्याचा प्रस्ताव महसूल प्रशासनाने मांडला होता परंतु त्यास तस्कर राजी न झाल्याने महसूल प्रशासनाने या तस्करांवर गुन्हे दाखल केले.
शनिवारी दुपारी पळशीच्या मंडलाधिकारी सुशीला अशोक मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीत नितीन रमेश अडसूळ, संदीप किसन कपाळे यांच्यासह दोन पोकलेनचे चालक व मालक, विना क्रमांकाच्या डंपरचे चालक व मालक यांच्यावर ३ कोटी ४० लाख ६५ हजार रूपयांच्या गौण खनिजांच्या चोरीसह अन्य कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत. पोकलेनशी संबंधीत अशोक शिवाजी रोहकले यास पोलिस निरीक्षक शरद जांभळे यांनी शनिवारी रात्री भाळवणी येथून ताब्यात घेतले. रोहकले यास न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयाने त्यास एक दिवसांची पोलिस कोठडी दिली.