दाभोळ येथे एकाच रात्री १७ घरफोडय़ा ’ लाखोंचा ऐवज लंपास
रायगड जिल्ह्य़ात सध्या चोरटय़ांनी धुमाकूळ घातला आहे. गेल्या महिनाभरात जिल्ह्य़ाच्या दक्षिण भागात घरफोडीच्या ५० हून अधिक घटना समोर आल्या आहेत. महाड तालुक्यातील दाभोळ गावात चोरटय़ांनी बुधवारी रात्री १७ घरे फोडून रोख रक्कम आणि दागिने मिळून लाखो रुपयांचा ऐवज पळवून नेला. दाभोळ खलाटी येथील २५० घरांच्या वस्तीतील सुमारे १०० हून अधिक घरे बंद असतात. या घरांमधील नागरिक कामाधंद्यानिमित्त मुंबईत स्थायिक आहेत. याचाच फायदा घेऊन चोरटय़ांनी यापकी १७ घरांची कडी कोयंडे तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटे फोडून त्यातील सोन्याचांदीचे दागिने आणि रोकड असा लाखो रुपयांचा ऐवज पळवून नेला. गुरुवारी सकाळी गावातील रहिवाशांना हा प्रकार लक्षात आला. तेव्हा त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. महाड पोलिसांनी तातडीने गावाला भेट देऊन पाहणी केली .रायगडचे पोलीस उपअधीक्षक राजा पवार यांनीही गावाला भेट देऊन गुन्ह्य़ाची माहिती घेतली. चोरटय़ांचा सुगावा लागण्याच्या दृष्टीने श्वानपथक तसेच ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते.
गावातील सहदेव वाडकर यांची मुलगी काजल हिचे लग्न ठरले आहे. तिच्या लग्नासाठी केलेले सर्व दागिने त्यांनी घरातील कपाटात ठेवले होते. या दागिन्यांवर चोरटय़ांनी डल्ला मारला. या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. हरी नाडकर यांच्याही घरातील दागिने चोरटय़ांनी पळवून नेले. या सर्व प्रकरणात महाड पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
रायगड जिल्ह्य़ाच्या दक्षिण भागात सध्या चोरटय़ांचा हैदोस सुरू आहे. या भागातील नागरिक नोकरी, व्यवसायानिमित्त मुंबई किंवा अन्यत्र स्थायिक झाले आहेत. त्यामुळे गावात वयस्कर मंडळी सोडली तर फारसे कुणी दिसत नाही. याचाच फायदा घेत मागील महिनाभरात चोरटय़ांनी या भागात उच्छाद मांडला आहे. तळा, माणगाव, म्हसळा, महाड आदि तालुक्यांमध्ये सातत्याने अशा घरफोडीच्या घटना घडताहेत. मात्र चोरटय़ांना जेरबंद करण्यात अद्यापही पोलिसांना यश आलेले नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Story img Loader