सातारा जिल्हय़ातील सर्व प्रकल्पांतील पाणी आता केवळ पिण्यासाठी राखून ठेवावे. पिण्याशिवाय इतर कोणत्याही कामासाठी चोरून पाण्याचा वापर करताना दिसला तर त्यांच्यावर शासनाने तात्काळ गुन्हे दाखल करावेत, असे आदेश पालकमंत्री शशिकांत शिंदे यांनी दिले.
दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर टंचाईस्थितीचा आढावा शशिकांत शिंदे यांनी घेतला. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी यांनी परिस्थितीची माहिती शिंदे यांना दिली.
शिंदे म्हणाले, पाऊस लांबल्याने टंचाई उपाययोजनांना राज्य शासनाने ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे, मात्र गरज पडल्यास ३१ जुलैनंतर ही मुदतवाढ दिली जाऊ शकते. सिंचन प्रकल्पातील पाणीसाठय़ाचे नियोजन काटेकोरपणे करावे. उरमोडीचे पाणी कण्हेर कालव्यातून खटाव व माण तालुक्यांना कुठल्याही परिस्थितीत देणे आपले प्राधान्य आहे. कोंबडवाडी येथील पंपगृह ३१ जुलैपर्यंत कार्यान्वित होण्याच्या दृष्टीने सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कामाला तात्काळ गती द्यावी. त्यात अपयश आल्यास संबंधितांना जबाबदार धरण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला.
कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरील शेतीपंपाचे वीजजोड त्वरित काढण्यात यावे तसेच नवीन पाणी वापरण्यासाठी चांगला पाऊस पडल्याशिवाय परवानगी देऊ नये. जुने पाझर तलाव, गाळ काढणे, विंधन विहिरी, लघुसिंचन, नव्या पाझर तलावांच्या कामाचा आराखडा तयार करून सादर करावा.
कोयना तसेच सोळशी खोऱ्यात अजून पाणीसाठा होऊ शकतो, धरण बांधता येईल, मात्र पुनर्वसनाचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, त्यासाठी प्रशासनाने पाहणी करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. याखेरीज गारपीट, दुबार पेरणीसाठी मदत, नुकसान पाहणी, त्याचा अहवाल सादर करावा असेही सांगितले. या वेळी सातारा जिल्हय़ातले सगळे लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा