तुकाराम झाडे
अजब कारभाराचा उत्कृष्ट नमुना पाहायचाय तर हिंगोली जिल्ह्यतील मुटकुळे गावात जा. वीज वितरण कंपनीतील एका अधिकाऱ्याने शेतकऱ्यांकडून १२ लाख रुपये घेतले. नऊ रोहित्रे आणि ९० खांब बसवून वीज दिली. मग वरिष्ठांना कळाले की दिलेली वीज अधिकृत नाहीच. मग सरकारी फतवा निघाला, गुन्हे दाखल करा. शेतकऱ्यांवर अनधिकृत वीज वापराचे गुन्हे दाखल झाले. बसविलेले रोहित्र काढून नेण्यात आले. आडगाव मुटकुळे येथील या कारभाराच्या विरोधात शेतकरी आता उपोषणास बसले आहेत.
ज्या शेतकऱ्यांना वीज पुरवठा करण्यात आला होता तो आता खंडित करण्यात आला आहे. या विरोधात उपोषण करून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांपैकी पांडुरंग मुटकुळे म्हणाले,‘आमच्या परिसरातील वीज अभियंता सुरेशसिंग राठोड यांनी या कामाच्या बदल्यात सुमारे बारा लाख रुपये घेतले.’ अभियंत्यांनी शेतकऱ्याकडून रक्कम घेतल्यानंतर कंत्राटदाराला हाताशी धरून सुमारे नव्वद खांब उभे करून नऊ रोहित्र बसवून दिले. वीज पुरवठाही सुरळीत झाला. मात्र हा सर्व प्रकार अनधिकृतरीत्या झाल्याची बाब वरिष्ठांपर्यंत गेली. ज्यांनी वीज पुरवठा दिला त्याच अभियंत्याने शेतकऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल केली. सेनगाव पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. गुन्हाही दाखल करण्यात आला. रोहित्र आणि विजेचे खांब काही खुल्या बाजारात मिळत नाहीत. मग आमच्यावर गुन्हा कशासाठी? आम्ही अभियंत्यांकडे पैसे जमा केले. झालेले काम अधिकृत की अनधिकृत हे आम्हाला कसे कळणार, असा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. हळद, रब्बी पिकांना पाणी देण्याची गरज भासेल तेव्हा वीज कोठून आणायची अशी शेतकऱ्यांना चिंता आहे.
दोषी वीज अभियंता विरुद्ध कायदेशीर कारवाई करून शेतकऱ्यांना तत्काळ वीज जोडणी करून द्यावी, या मागणीसाठी सुमारे वीसच्या वर शेतकऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले असून वीज जोडणी करून दिल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही, असेही आंदोलनकर्त्यां शेतकऱ्यांनी सांगितले. उपोषण मागे घ्यावे यासाठी महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता गणेश नरदेव यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली.