मराठा समाजाला आरक्षण मिळालं ही बाब आनंदाची आहे यात काहीही शंका नाही. आता सरकारने मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे विनाअट मागे घ्यावेत अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. मराठा आरक्षण मिळवण्यासाठी जे आंदोलन झाले त्यामध्ये १० हजारांपेक्षा जास्त मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. या सगळ्यांवरचे गुन्हे विनाअट मागे घेतले गेले पाहिजेत अशी मागणी आपण सरकारकडे करणार आहोत असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
सकल मराठा समाजाच्या आंदोलकांचे आंदोलन आझाद मैदानावर सुरु आहे. १६ टक्के आरक्षणाची घोषणा झाल्यानंतरही आमचे आंदोलन सुरुच राहणार अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आंदोलकांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी एक भाषण केलं.या भाषणात त्यांनी विरोधकांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने सरकारला आरक्षण द्यावंच लागलं असं म्हटलं आहे. इतकंच नाही तर मराठा बांधवांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि त्यांनी केलेल्या आंदोलनांमुळे सरकारला आरक्षण द्यावं लागलं आता ते कोर्टात टिकलंच पाहिजे अशीही मागणी त्यांनी केली.
ज्या आंदोलकांना मराठा आंदोलकांना प्राण गमवावे लागले त्यांच्या कुटुंबीयांना तातडीने मदत करावी अशीही मागणी अजित पवार यांनी यावेळी केली. ज्या मराठा बांधवांचा बळी गेला आहे, त्यांच्या कुटुंबीयांना दहा लाखांची मदत आणि कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी अशी मागणी मराठा बांधवांनी केली आहे. ती लवकरात लवकर पूर्ण करावी असेही अजित पवार यांनी म्हटले आहे. तसेच आज सरकारसोबत इतर काही मुद्द्यांसंदर्भात बैठक होणार आहे त्यावेळी मराठा समाजाच्या मागण्यांबद्दल चर्चा करणार असल्याचे सांगितले आहे.