अनैतिक व्यवसायप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या ४० वर्षीय महिलेला रेल्वेमधून तिच्या राहत्या घरी पोलीस बंदोबस्तात घेऊन जात असताना तिने धावत्या गाडीतून उडी मारून पलायन केले. मनमाड लोहमार्ग पोलीस स्थानकात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसने पश्चिम बंगाल ते मुंबई असा प्रवास करणाऱ्या मुमताज काशा मुल्ला (४०) या महिलेसह अनैतिक व्यवसाय करणाऱ्या चार महिलांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. न्यायालयाच्या आदेशाने या महिलांना त्यांच्या राहत्या गावी सोडून देण्याची जबाबदारी पोलिसांवर होती. या महिला पश्चिम बंगालमधील असल्याचे सांगण्यात आल्याने पोलीस त्यांना तेथे घेऊन जात होते. चारपैकी दोन महिलांचे घरचे पत्ते मिळाल्याने त्यांना पश्चिम बंगालमध्ये त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. परंतु इतर दोन महिलांनी चुकीची माहिती दिल्याने त्यांचे नातेवाईक पश्चिम बंगालमध्ये सापडले नाहीत. अखेर पोलीस या दोन्हीही महिलांना पुन्हा मुंबई येथे ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसमधून घेऊन जात होते.
गाडीने मनमाड सोडल्यानंतर मुमताजने आपल्याला शौचालयात जायचे असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी तिला तेथे सोडले, परंतु बराच वेळ झाल्यानंतरही मुमताज बाहेर आली नाही. त्यामुळे पोलिसांना संशय आला. त्यांनी शौचालयाचा दरवाजा जोराने वाजविला, परंतु प्रतिसाद मिळाला नाही. पोलिसांनी अखेर गाडीच्या दरवाजातून बाहेर वाकून शौचालयाच्या खिडकीकडे बघितले असता खिडकीला काच नसल्याने लक्षात आले. खिडकीतून कर्मचाऱ्याने शौचालयात प्रवेश केला असता मुमताज दिसली नाही. मनमाड ते लासलगावदरम्यान मुमताजने धावत्या गाडीतून पलायन कसे केले, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पोलीस पथकाने बसस्थानक परिसरातील कुंटणखान्यांमध्ये शोध घेऊनही मुमताज सापडली नाही.
मनमाड लोहमार्ग पोलीस स्थानकात मुंबई येथील पोलीस कर्मचारी युवराज वेताळ यांच्या फिर्यादीवरून मुमताजविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Story img Loader