पोलीस अधीक्षक ठाकर यांच्या बदलीची आमदारांकडून मागणी
शहरात कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली असून नासेरबीन चाऊसच्या अटकेनंतर परभणी हे दहशतवाद्यांसाठी महत्त्वाचे केंद्र होत आहे. पोलिसांच्या आशीर्वादाने जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणात चालू असलेले अवैध धंदे जोवर बंद होत नाहीत तोवर जिल्ह्यातली गुन्हेगारी नष्ट होणार नाही. त्यामुळे पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांची बदली झाली पाहिजे, असे आग्रही मत आमदार डॉ. राहुल पाटील यांनी व्यक्त केले. या प्रश्नावर आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असून जिल्ह्याला कर्तबगार पोलीस अधीक्षक देण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले असल्याचेही आमदार पाटील यावेळी म्हणाले.
जिल्ह्यातल्या पोलीस प्रशासनावर आमदार पाटील यांनी पत्रकार बैठकीत कठोर टीका केली. जिल्ह्यात मटका, जुगारअड्डे आदींसह अनेक अवैध धंदे चालले असून पोलीस त्यावर कारवाई करण्याऐवजी पुरावा मागत आहेत. यापूर्वी आपण दोन-तीन वेळा अवैध धंद्यांचा प्रश्न घेऊन पोलीस अधीक्षकांची भेट घेतली.
मात्र कोणतीच कारवाई होत नाही. उलट आता परभणी हे गुन्हेगारांना पोषक वातावरण असणारे शहर ठरले आहे. अवैध धंद्यांच्या माध्यमातून पापाचा पसा कमावणारे शहरात गुन्हेगारी करीत आहेत, अशी टीकाही यावेळी आमदार डॉ. पाटील यांनी केली.
मतदारसंघातील विविध विकास प्रश्नांबाबतही त्यांनी यावेळी माहिती दिली. परभणीसाठी नवी औद्योगिक वसाहत स्थापन करण्यासंदर्भात सर्वेक्षणाचे काम पुन्हा सुरू करण्यात येईल. त्यासाठी बाभळगाव, बोरवंड आदी गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधला जाईल, असेही ते म्हणाले. जय भवानी महिला सहकारी सूतगिरणी उभारण्याचा मानस असून मान्यतेसाठी पाठपुरावा सुरू असल्याचेही ते म्हणाले. जिल्ह्यात सहकाराला पुनरुज्जीवित केल्याशिवाय जिल्ह्याची प्रगती होणार नाही. त्यामुळे ही महिला सहकारी सूतगिरणी राज्यात अव्वल कशी राहील याचा आपण प्रयत्न करू, असे ते म्हणाले.
शहरातील वाढीव पाणीपुरवठा योजना रखडली आहे. खरे तर राहटी बंधाऱ्याची उंची वाढवून त्यात लोअर दुधनाचे पाणी सोडले तरीही परभणीचा पाणी प्रश्न कायमचा सुटला असता आणि एवढा कोटय़वधी रुपयांचा खटाटोप करण्याची आवश्यकता नव्हती. पण या योजनेत शहरवासीयांना पाणी कसे मिळेल ते पाहिले गेले नाही. वाढीव पाणीपुरवठा योजना लवकर पूर्ण झाली पाहिजे. जे यात दोषी असतील त्यांच्यावर कारवाईही झाली पाहिजे, असेही डॉ. पाटील यावेळी म्हणाले. देवठाणा ते मुरुंबा हा पूल, देवठाणा ते संबर, बोबडे टाकळी ते साडेगाव, धार या महत्त्वाच्या रस्त्यांची कामे होत आहेत.
मतदारसंघातले सर्व रस्ते पक्के केले जातील, असेही त्यांनी सांगितले. पाथरी रोडवर एमबीबीएस वैद्यकीय महाविद्यालय सुरूकरण्याच्या कामास प्रारंभ झाला आहे. त्याचबरोबर आयुर्वेद विद्यापीठाचे उपकेंद्र परभणीत व्हावे यासाठीही आपला पाठपुरावा सुरू असल्याचे आमदार डॉ. पाटील म्हणाले.
आगामी महापालिका निवडणूक शिवसेना स्वबळावर लढवणार असून महापालिकेवर भगवा फडकला जाईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा