सलग आठ तासांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे वर्धा जिल्ह्यावर पुन्हा एकदा अस्मानी संकट कोसळले आहे. ग्रामीण भागाची चांगलीच दैना उडाली असून सर्वच तालुक्यात अतिवृष्टी होत असल्याने शंभरावर खेड्यांचा संपर्क तुटला आहे. अनेक गावांत घरांची पडझड तसेच काही गावांतील नागरिकांना पुरामुळे सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. संततधारेचा आजचा सलग सातवा दिवस अस्मानी संकटाचा ठरत आहे.
हिंगणघाट महसूल मंडळात रविवारी रात्री २११ मि.मी. अशी विक्रमी पर्जन्यवृष्टी झाली. महकाली नगरात पाणी शिरल्याने वीस कुटुंबास सुरक्षितस्थळी हलविणे सुरू आहे. सेलूत बाभुलगाव पुलावरून पाणी वाहू लागल्याने वाहतूक ठप्प पडली तसेच अनेक घरे पाण्याखाली आली. समुद्रपूर तालुक्यात बारा तासांपासून वृष्टी सुरू असल्याने जाम ते समुद्रपूर, वडगाव ते पिंपळगाव, साखरा ते मंगरूळ, कोरा ते नंदोरी, समुद्रपूर ते वायगाव, सेवाग्राम ते समुद्रपूर मार्ग बंद पडले. वीसपेक्षा अधिक गावे पाण्याने वेढलेली असल्याचे प्रशासनाने सांगितले. आर्वीत वर्धमनेरी पुलावरून पाणी वाहू लागल्याने सुरक्षेसाठी दोन्ही बाजूला पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे, तसेच शिरपूर रस्ता बंद पडला आहे. पोथरा नदीच्या पुराने सावंगी, पिंपळगाव व अन्य सात गावांचा संपर्क तुटला आहे. पवनार येथील जुन्या पुलावरून आज सकाळी पाणी वाहने सुरू झाले. सेलू तालुक्यात चाणकी ते कोपरा पुलावरून पाणी वाहू लागले तसेच महामार्गाच्या कामामुळे हमदापूर येथील घरात पाणी शिरले. चिंचोली नाल्याला पूर आल्याने वाहतूक ठप्प पडल्याचे तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी सांगितले.
तर, बोर नदीला पूर आल्याने गावात पाणी शिरत असून आवश्यक ती खबरदारी घेतली जात असल्याचे ते म्हणाले. बोरखेडी कला, कान्होली, कुटकी, दाभा परिसरावर पुराचे संकट आहे. सेलू मंडळ सर्वाधिक संकटात सापडल्याची स्थिती आहे. सिंदी, दिग्रस,पाळसगाव, दहेगाव, पहेलांपुर गावांचा संपर्क तुटला आहे. देवळीत सोनोरा ढोक गावात पाणी शिरल्याने अनेक कुटुंबांना अन्यत्र हलविण्यात येत आहे तसेच भदाडी नदीला पूर आल्याने तातडीने मदत पाठविण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. लाल नालाच्या पाच तसेच निम्न वर्धा प्रकल्पाच्या सर्व एकतीस दारातून आज सकाळपासून पाण्याचा विसर्ग सुरू झाला असून पुढील काही काळ धोक्याचा असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे म्हणाल्या.
आमदार भोयर यांची शाळांना सुटी देण्याची मागणी –
अतिवृष्टीचे संकट लक्षात घेऊन जिल्ह्यातील शाळांना सुटी देण्याची मागणी आमदार डॉ. पंकज भोयर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. शासकीय कर्मचाऱ्यांसह शिक्षक, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पुराच्या पाण्यातून मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.