अव्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी सामायिक परीक्षेच्या पर्यायावरही प्रश्नचिन्ह

नागपूर : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षाही रद्द करण्यात आली. बारावीच्या मूल्यांकनासाठी शिक्षण विभागाने अद्याप कुठलाही मार्ग सुचवलेला नाही. शिवाय पदवी प्रथम वर्षांला अनेक अभ्यासक्रम असल्याने प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र प्रवेशपूर्व परीक्षा (सामायिक परीक्षा) घेणे शक्य नाही. त्यामुळे  व्यावसायिक अभ्यासक्रम वगळता विज्ञान, वाणिज्य, कला आणि इतर अभ्यासक्रमांचे प्रवेश कसे होणार, असा प्रश्न महाविद्यालयांसह विद्यार्थ्यांसमोर आहे.

करोनामुळे प्रथमच सीबीएसई बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्यापूर्वी दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेताना राज्य सरकारने अकरावी प्रवेशासाठी वैकल्पिक सीईटी परीक्षा घेण्याचे जाहीर केले. आता केंद्र सरकारच्या निर्णयाप्रमाणेच राज्यातही बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली. बारावीनंतर अभियांत्रिकीसह आर्किटेक्ट, औषध निर्माण व कृषी अभ्यासक्रमात प्रवेशासाठी राज्यात सीईटी परीक्षा घेतली जाते. बारावीची परीक्षा रद्द झाल्यास विज्ञान, वाणिज्य, कला या पारंपरिक अभ्यासक्रमासह तीन व चार वर्षीय इतर पदवी अभ्यासक्रमासाठी सामयिक प्रवेश परीक्षा घेण्यात यावी, अशी मागणी महाविद्यालयांकडून होऊ लागली आहे. मात्र, पदवी प्रथम वर्षांला अनेक अभ्यासक्रम असल्याने सीईटी घेणे अडचणीचे जाणार आहे. त्यामुळे राज्य शासनाने सर्व विद्यापीठ आणि महाविद्यालयीन प्रवेशासाठी एकसूत्री कार्यक्रम आखावा अशी मागणी होऊ लागली आहे.

विद्यापीठांनी सीईटी घ्यावी 

परीक्षा व अंतर्गत मूल्यमापनावरून विद्यार्थ्यांची गुणवत्ता सिद्ध करणे कठीण असल्याने सामायिक प्रवेश परीक्षा घेण्यात यावी, असे मत महाविद्यालयातील प्राचार्यानी व्यक्त केले. सोबतच ही परीक्षा राज्यातील उच्च व तंत्र शिक्षण विभागाने घ्यावी असेही सांगितले. राज्यातील सर्व विद्यापीठाचा अभ्यासक्रम वेगवेगळा असल्याने यातही अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवेश परीक्षा विद्यापीठाने घ्यावी, असाही एक मतप्रवाह आहे.

विद्यापीठांमध्ये एकच अभ्यासक्रम नसतो. राज्य सरकारही वेगवगळ्या अभ्यासक्रमांसाठी वेगवेगळी प्रवेश परीक्षा घेते. त्यामुळे अशाप्रकारची एकच परीक्षा घेता येणे विद्यापीठालाही शक्य नाही. मात्र, तरीही शासनाने जबाबदारी दिल्यास प्राधिकरणाच्या मान्यतेनुसार तशा परीक्षा घेता येतील.

-डॉ. प्रफुल्ल साबळे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, नागपूर विद्यापीठ.

Story img Loader