विधानसभेच्या पाश्र्वभूमीवर जिंतूर मतदारसंघात पुन्हा राजकीय सत्तासंघर्ष सुरू झाला असून, साखर कारखान्याच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विजय भांबळे यांनी आमदार रामप्रसाद बोर्डीकरांवर केलेल्या टीकेला मेघना बोर्डीकर यांनीही तडाखेबंद उत्तर दिले. ‘मनोबल खचल्यामुळेच विरोधक असे बोलत आहेत. जनताच त्यांना राजकारण सोडायला लावेल,’ अशी टीका त्यांनी भांबळे यांच्यावर केली.
साखर कारखाना उभारणीचे भांडवल करून आमदार बोर्डीकर शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहेत, अशी टीका दोन दिवसांपूर्वी भांबळे यांनी केली होती. या कारखान्याला परवानगीच नसून, परवानगी दाखवली तर आपण राजकारण सोडू, असे आव्हान भांबळे यांनी दिले होते. गुरुवारी मेघना बोर्डीकर यांनी भांबळे यांना तोडीस तोड उत्तर दिले. नाव न घेता टीका करताना त्या म्हणाल्या की, सलग तीन वेळा जनतेने त्यांना धडा शिकवला. आता त्यांचे मनोबल खचले आहे. मानसिक संतुलन बिघडल्यानेच असे आरोप आता ते करू लागले आहेत. मतदारसंघात होत असलेल्या साखर कारखान्यामुळे ग्रामीण भागातील युवकांना रोजगार मिळणार असून, अर्थकारणाला मोठा प्रकल्प चालना देणार आहे. साखर कारखान्याचे कामही प्रगतिपथावर आहे. असे असताना हा कारखाना म्हणजे दिशाभूल असल्याचा आरोप करणाऱ्यांनी दुसऱ्याच्या जीवावर राजकारण करू नये, असा टोलाही श्रीमती बोर्डीकर यांनी लगावला. येत्या निवडणुकीत त्यांची अनामत जप्त होईल व राजकारण सोडण्याचे आव्हान त्यांनी दिले असले, तरी जनताच त्यांना राजकारण सोडायला भाग पाडेल, अशी टीका भांबळे यांचे नाव न घेता त्यांनी केली.
जिंतूर येथे आयोजित उमंग मेळाव्याला चांगला प्रतिसाद मिळाला. हजारो युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होण्याची शक्यता या निमित्ताने निर्माण झाली, असे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादीचे सेलू तालुकाध्यक्ष दत्तराव पौळ यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याचेही त्यांनी सांगितले. पत्रकार बठकीला नामदेव डख, डॉ. पंडितराव दराडे, मिलिंद पवार, आत्माराम पवार, अशोक सेलवाडीकर, रवी  डासाळकर, हनुमान सोमाणी आदी उपस्थित होते.