महायुतीचे उमेदवार संजय जाधव बाहेरच्या जिल्ह्यातील आहेत, तर सोनिया गांधी तरी कुठे भारताच्या आहेत? असा सवाल भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी करून या निवडणुकीत अजित पवारांची मस्ती उतरविणार असल्याचा इशारा दिला.
महायुतीच्या प्रचारार्थ जिंतूरमधील साई मदानावर मुंडे यांची जाहीर सभा झाली. शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे, माजी आमदार बबनराव लोणीकर, उमेदवार जाधव, गणेशराव रोकडे, भाजप जिल्हाध्यक्ष विठ्ठल रबदडे, दिलीप दुधगावकर, श्यामसुंदर मुंडे, सुरेश बंडगर, डॉ. निशांत मुंडे, राजेंद्र थिटे, अभय चाटे, अप्पासाहेब डख उपस्थित होते.
माझ्या पराभवासाठी शरद पवार बीडमध्ये मुक्काम ठोकून आहेत. परंतु बारामतीत सुप्रिया सुळे, नांदेडमध्ये अशोक चव्हाण, उस्मानाबादमध्ये पद्मसिंह पाटील यांचा पराभव होईल, असे मुंडे म्हणाले. पाच पांडवांच्या महायुतीत सहावे मेटे सहभागी झाले. त्यामुळे आघाडी सरकारची तिरडी उचलण्यासाठी चार खांदेकरी, एक मडके धरण्यासाठी व एक आधार देण्यासाठी अशी ही महायुती आहे, असे ते म्हणाले. विदेशातील सोनिया गांधी तुम्हाला चालतात. मग बाहेरील जिल्हय़ातील जाधव का चालत नाहीत? शरद पवार तरी कुठे बारामतीचे आहेत, असा सवाल करून आघाडी सरकारमधील राज्यकत्रे मस्तवाल झाले आहेत, असा आरोप त्यांनी केला.
जिंतूरमध्ये मुंडे सभेस येणार नाहीत. ते मॅनेज झाले आहेत, अशी अफवा विरोधकांकडून उठवली जात होती. त्याचा समाचार घेताना मुंडे यांनी, १९९५ मध्येही पवारांच्या विरोधात रान उठवून युतीची सत्ता मिळविली. मुंडेंना मॅनेज करण्यासाठी पवारांच्या तीन पिढय़ांना जन्म घ्यावा लागेल. या निवडणुकीत अजित पवार यांची मस्ती उतरविल्याशिवाय राहणार नाही, असा हल्ला चढवून भांबळे जिंतूरचे स्थानिक उमेदवार असले, तरी मतदार त्यांचा पराभव केल्याशिवाय राहणार नाहीत, असेही मुंडे यांनी ठणकावले.
मी गुंडगिरी करतो. पण ती सर्वसामान्यांना त्रास देण्यासाठी नाही, तर त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय-अत्याचाराविरोधात गुंडगिरी करतो, असे उत्तर जाधव यांनी विरोधकांच्या आरोपाला दिले. राष्ट्रवादीची सध्या केविलवाणी परिस्थिती झाली आहे. त्यांच्याकडून पशाचा वापर केला जात आहे. परंतु ही लढाई ‘धनशक्ती विरुद्ध जनशक्ती’ अशी आहे. त्यामुळे मुंडे यांच्या नेतृत्वाखाली लालकिल्ल्यावर भगवा फडकविल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास जाधव यांनी व्यक्त केला.
सभेला बोर्डीकर समर्थक कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. सभेनंतर मुंडे हे आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या महाविद्यालयात चहापानास गेले. तेथे मुंडे व बोर्डीकर यांच्यात गोपनीय चर्चा झाली.

Story img Loader