आरोग्य खात्याच्या विविध कार्यक्रमांना वित्त विभागाच्या वतीने मिळणाऱ्या मंजुरीच्या अनुषंगाने आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी आज येथे अप्रत्यक्षरीत्या अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली. जालना येथील महिला व बाल शासकीय रुग्णालयाच्या ३७ कोटी रुपये खर्चाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन शेट्टी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.
राज्यमंत्री अब्दुल सत्तार आणि आमदार कैलास गोरंटय़ाल यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री राजेश टोपे होते. आरोग्य विभागाच्या संदर्भात जिल्हय़ातील विविध मागण्यांचा उल्लेख टोपे यांनी आपल्या भाषणात केला होता. त्याचा संदर्भ देऊन टोपे यांना उद्देशून शेट्टी म्हणाले, की वित्त विभाग तुमच्या नेत्याकडे आहे. जिल्हय़ातील आरोग्य खात्याच्या विविध कार्यक्रमांसाठी तुम्ही मंजुरी आणून द्या. मी त्यासाठी प्रस्ताव देतो. शासकीय महिला व बाल रुग्णालय १०० खाटांऐवजी २०० खाटांचे करण्यासाठी निधी आणून दिला तर मी त्याचे भूमिपूजन करतो!
शेट्टी म्हणाले, की मागील साडेचार-पाच वर्षांत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने आरोग्य खात्यात चांगले काम केले आहे. महाराष्ट्र यासाठी आघाडीवर आहे. मी प्रसिद्धीवर खर्च कमी करतो, त्यामुळे दूरचित्रवाणी किंवा जाहिरातींमध्ये मी दिसत नाही. हा पैसा मी आरोग्य खात्याच्या कार्यक्रमावर खर्च करतो. केंद्रात नव्याने आलेल्या मोदी सरकारनेदेखील आम्हाला चांगल्या कामगिरीबद्दल पारितोषिक दिले आहे. टोपे या वेळी म्हणाले, की जिल्हा महिला व बाल रुग्णालयातील खाटांची संख्या १०० वरून २०० करण्याची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे या रुग्णालयात आणि जिल्हा रुग्णालयात निकषाप्रमाणे पदांची स्थापना करण्यात यावी. जिल्हा शासकीय रुग्णालय ३०० खाटांचे करण्यात यावे. जिल्हा परिषद अध्यक्ष आशाताई भुतेकर, नगराध्यक्ष पार्वताबाई रत्नपारखे, आमदार सुरेश जेथलिया, आमदार संतोष सांबरे, माजी मंत्री डॉ. शंकरराव राख आदींची उपस्थिती या वेळी होती. राम सावंत यांनी संचालन केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा