गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूनंतर केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांच्या मुलीला घेतले जाईल, या साठी आम्ही लोकसभेला उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही. सीबीआय चौकशीचा अहवाल प्रसिद्ध झाला असला, तरी संशयाची पाल कायम आहे, असे सांगतानाच मुंबईतील हिरे विक्रीचे केंद्र गुजरातला हलवून एक लाख मुलांना बेरोजगार करण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. धनंजय मुंडे यांच्यात राज्याचे नेतृत्व करण्याची धमक असल्याची पुष्टीही त्यांनी जोडली.
परळीतील उमेदवार धनंजय मुंडे यांच्या प्रचारार्थ गुरुवारी पवार यांची सभा झाली. पंडितराव मुंडे, आमदार अमरसिंह पंडित, अशोक डक यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते. पवार म्हणाले की, काही वर्षांपूर्वी या भागाचे आमदार रघुनाथराव मुंडे यांचाही अपघाती मृत्यू झाला. तो कसा झाला ते समजले नाही. या भागाचे भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचा नवी दिल्लीत अपघात झाला. या बाबतही लोकांच्या मनात संशय कायम आहे. पंतप्रधान मोदींना आपण पत्र लिहून मुंडेंच्या अपघाताची चौकशी करण्याची मागणी केली. या चौकशीचा अहवाल प्रसिद्ध झाल्याचे आज वर्तमानपत्रांत वाचले. मात्र, मनात शंकेची पाल कायम आहे. या दोन्ही नेत्यांना जनतेने स्वीकारले होते. पण त्यांचा अपघातात मृत्यू झाला.
धनंजय मुंडे यांच्या सूचनेवरून गोपीनाथ मुंडेंच्या जागेवर केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांच्या मुलीला संधी मिळावी, या साठी राष्ट्रवादीने उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याचा फायदा होताना दिसत नाही. जिल्ह्य़ातील राष्ट्रवादीच्या मंत्री डॉ. विमल मुंदडा, काँग्रेसचे राजेश पायलट, माधवराव िशदे यांच्या मृत्यूनंतरच्या पोटनिवडणुका भाजपने लढवल्या होत्या, याची आठवणही त्यांनी करून दिली. मोदी प्रत्येक तालुक्यात सभा घेऊन मत मागत आहेत. मात्र, त्यांना सीमेवर पाकिस्तान हल्ला करीत असल्याच्या घटनेचे गांभीर्य नाही. देशाला पूर्ण वेळ संरक्षणमंत्रीही नाही. तीन महिन्यांतील भाजपच्या कारभाराविरोधात जनतेत रोष आहे. त्यामुळेच पोटनिवडणुकीत त्यांचा पराभव झाला. शेतीमालाची निर्यात बंदी केल्यामुळे ऊस, सोयाबीनचे भाव कमी झाल्याची टीकाही त्यांनी केली.
मुंबईतील हिऱ्यावर पलू पाडण्याच्या कामात एक लाख मुलांना रोजगार मिळतो. आपण मुख्यमंत्री असताना जमीन देऊन हिऱ्याचे विक्री केंद्र सुरूकेले. यातून ११ हजार कोटींची निर्यात होते. मात्र, गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी हिरे व्यापाऱ्यांची बठक घेऊन हे केंद्र गुजरातला हलवण्याचा डाव मोदींच्या माध्यमातून चालवला आहे, असा आरोपही पवार यांनी केला. धनंजय मुंडे परळीपुरते मर्यादित नसून, राज्याचे नेतृत्व करण्याची धमक त्यांच्यात असल्याचे प्रशस्तिपत्रही त्यांनी दिले. भाजपने चालवलेला प्रचार ११ कोटी जनतेचा अवमान करणारा आहे, असेही ते म्हणाले. धनंजय मुंडे यांनी,‘‘२० वष्रे लोकांची कामे केली. एकदा संधी द्या, आयुष्यभर काम करेन,’’ अशी ग्वाही दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा