सत्ता मिळाल्याबरोबर भाजपने शिवसेनेशी हिंदुत्वाचे नाते तोडून टाकले. छत्रपती शिवाजीमहाराज कधी दिल्लीसमोर वाकले नाहीत. दिल्लीसमोर वाकायचे नाही ही शिकवण त्यांनी आम्हाला दिली. मीसुद्धा दिल्लीसमोर कशाला वाकू? असा सवाल करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला. भाजप जणू काँग्रेस-राष्ट्रवादीसाठीच काम करीत आहे, असा आरोप करून भाजप ओवेसींसोबतही जाईल, असा टोलाही उद्धव यांनी लगावला.
शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ ठाकरे यांची येथे सभा झाली. सेनेचे संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर, उपनेते लक्ष्मण वडले, खासदार संजय जाधव, उमेदवार डॉ. राहुल पाटील (परभणी), डॉ. शिवाजी दळणर (गंगाखेड), मीरा रेंगे (पाथरी), राम पाटील (जिंतूर) आदी उपस्थित होते. ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसह भाजपवर सडकून टीका केली. भाजप आज शिवाजीमहाराजांचा आशीर्वाद मागून राज्यात विधानसभेचा प्रचार करीत आहे. या लोकांनी शिवजयंती तरी कधी साजरी केली का? शिवाजीमहाराजांचा आशीर्वाद पेलायला मर्द शिवसनिक लागतो आणि हृदयातही भगवा असावा लागतो. भाजपसोबत युती जागावाटपावर नव्हे, तर िहदुत्वावर आधारित होती. शिवसेना म्हणजे या लोकांना जागांचे गोडाऊन वाटले काय? दुष्काळ असताना हे केंद्रातून पाहणी करण्यास आले नाहीत आणि आता प्रचारासाठी सगळा लवाजमा घेऊन भाजपचे मंत्री येत आहेत. महाराष्ट्रात मोदींच्या ८ सभा होणार आहेत. मोदी लाट आहे मग सभा कशाला? असा सवालही ठाकरे यांनी केला.
एकीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीचे लुटारू व दुसरीकडे महाराष्ट्र तोडणारे, अशा स्थितीत मतविभागणी टाळून सेनेच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन ठाकरे यांनी केले. पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार यांच्यावरही टीका केली. सेनेची सत्ता आल्यास गोदावरी खोऱ्याचा विकास, दप्तरांचे ओझे कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांना ‘टॅब’, शेतीत सुधारणा असे त्यांनी सांगितले. मराठवाडय़ातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचे पीककर्ज पंतप्रधान मोदींनी माफ करावे, असेही ते म्हणाले. सेनेचे जिल्हाप्रमुख डॉ. संजय कच्छवे यांनी सूत्रसंचालन केले. सभेला शिवसनिकांनी मोठी गर्दी केली होती. जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, डॉ. संजय कच्छवे, महिला आघाडीच्या सखूबाई लटपटे आदी उपस्थित होते.

Story img Loader