देशात काँग्रेसने घराणेशाही तर शिवसेना-भाजपाने जातीयवाद वाढवला. राजकारणात बरबटलेल्या लोकांची संख्या वाढल्याने सामान्य माणसाला राजकारणात उतरावे लागत आहे. नेत्यांना आम आदमी बनविण्याची ही परिवर्तनाची लढाई असल्याचे प्रतिपादन आपच्या समन्वयक अंजली दमानिया यांनी केले.
आम आदमी पक्षाचे उमेदवार नितीन उदमले यांच्या प्रचारार्थ येथील मारुती मंदिरासमोर दमानिया यांची सभा घेण्यात आली. पी. आर. िशदे, उदमले, राजू आघाव, बाळासाहेब पटारे यावेळी उपस्थित होते. दमानिया म्हणाल्या, भ्रष्टाचाराची, घाणेरडय़ा राजकारणाची सर्वाधिक झळ सामान्य नागरिकांना बसते. लोकांचे प्रतिनिधी राजे बनले आणि लोक हताश बनले. गुंड लोक राजकारणात मुख्य पदांवर आहेत. हे चित्र बदलण्यासाठी आम आदमी पक्ष परिवर्तनाची लढाई लढत आहे. केजरीवाल यांना पंतप्रधान बनविण्यासाठी किंवा उदमले यांना खासदार करण्यासाठी मतदान करू  नका तर सामान्य माणसाला त्याचा न्याय देण्यासाठी गब्बर पुढाऱ्यांना त्यांची जागा दाखविण्यासाठी उदमले यांना मतदान करून जिल्ह्यातील घराणेशहांना त्यांची जागा दाखवा, असे आवाहन त्यांनी केले.
उदमले म्हणाले, आपमध्ये कुणी छोटे, मोठे नाही. राज्याचे पदाधिकारी आले म्हणून हार तुरे लागत नाहीत. ही सर्वसामान्य मतदारांची लढाई आहे. मी सुशिक्षित, प्रशासनात काम करण्याचा अनुभव असलेला उमेदवार आहे. समोर सत्तेसाठी हपापलेले उमेदवार आहेत. मी निवडून आल्यास मतदारसंघाचा पाण्याचा, रस्त्याचा तसेच रोजगाराचा प्रश्न मार्गी लावील, असे आश्वासन त्यांनी दिले. शेतकरी संघटनेचे बाळासाहेब पटारे यांनी सूत्रसंचालन केले.

Story img Loader