राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा नरेंद्र मोदी यांचा ‘रिमोट कंट्रोल’ आहे. संघाची देश विघटनाची, तर भाजपची एकसंध महाराष्ट्राचे तुकडे करण्याची भूमिका आहे. एकसंध महाराष्ट्र विभागला, तर मराठवाडय़ासारख्या मागास प्रदेशाची स्थिती आजच्यापेक्षा वाईट होईल, अशी भीती व्यक्त करुन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी गुजरातचा विकास हा बकवास आहे. गुजरातपेक्षा महाराष्ट्र किती तरी गोष्टींत पुढे आहे, असे सांगितले.
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार विजय भांबळे यांच्या प्रचारार्थ सेलू येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. उमेदवार भांबळे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुरेश देशमुख, राज्यमंत्री फौजिया खान, आमदार बाबाजानी दुर्राणी, माजी खासदार तुकाराम रेंगे आदी उपस्थित होते. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचा समाचार घेताना चव्हाण म्हणाले की, मोदींचा मुकाबला करण्यास काँग्रेस तयार आहे. महाराष्ट्राचे तुकडे करण्याची भाजपची भूमिका असली, तरी महाराष्ट्र एकसंध राहिला पाहिजे, यावर काँग्रेस ठाम आहे. मोदी सरकारने गुजरातेत एन्काऊंटरमध्ये अल्पसंख्याक समाजाचे बळी घेतले. अशा लोकांवर विश्वास कसा ठेवणार, असा सवाल करुन चव्हाण यांनी अल्पसंख्याक मुस्लीम समाजाने गाफील न राहता योग्य निर्णय घ्यावा, अन्यथा भविष्यात काळ माफ करणार नाही, असे सांगितले. सध्याच्या स्थितीत धर्मनिरपेक्षतेची भूमिका केवळ बोलून चालणार नाही, तर कृतीतून दाखवावी लागणार आहे. अन्न सुरक्षा विधेयक व राजीव गांधी जीवनदायिनी योजना यांसारख्या गरिबांच्या कल्याणाच्या अनेक योजना राज्यात काँग्रेस सरकारने आणल्या, असे चव्हाण म्हणाले.
दीड वषार्ंपूर्वी महाराष्ट्रातील टंचाईग्रस्त भागात गुजरातेतून पशुखाद्य पुरवठा केला होता. परंतु मोदी सरकारने आता त्या पुरवठाधारकांवरच गुन्हे दाखल केले. मदत करणाऱ्यालाच धारेवर धरण्याची ही कुठली माणुसकी व अशा लोकांकडून देशाचे काय भले होणार, असा टोलाही चव्हाण यांनी लगावला. भांबळे यांना विजयी करण्यास काँग्रेसमधील सर्व मंडळी सहकार्य करतील याची आपण खात्री देत आहोत, असे चव्हाण यांनी जाहीर केले.
मराठवाडय़ाचा अनुशेष दूर करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून निधी खेचून आणावा लागेल. ती धमक भांबळे यांच्यात दिसते. मराठवाडय़ात आघाडीच्या सर्व आठ जागा निवडून आल्या पाहिजेत असाच प्रयत्न आपला राहील, असेही ते म्हणाले.

Story img Loader