लोकसभा निवडणुकीच्या वेळी ‘अच्छे दिन’ आणण्याचे आश्वासन देऊन भाजपने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कें द्रात सत्ता स्थापन केली. परंतु दिलेली आश्वासने पूर्ण न करणारे मोदी आता विधानसभेच्या निमित्ताने महाराष्ट्रात येऊन पुन्हा स्वप्ने दाखवत आहेत. परंतु राज्यातील जनता त्यांच्या भूलभुलय्यांना बळी पडणार नाही, अशी टीका बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी येथे केली.
बसप उमेदवारांच्या प्रचारार्थ मायावती यांची सभा झाली. आपल्या भाषणात त्यांनी काँग्रेस, भाजपवर टीका केली. राज्यात बसप  जवळपास सर्व जागा स्वबळावर लढवत आहे. स्वातंत्र्यानंतर केंद्रात व महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्ये काँग्रेस, तसेच भाजपची सत्ता राहिली. परंतु या सरकारांच्या काळात ठराविक भांडवलदारांचा विकास झाला. महाराष्ट्र व अन्य राज्यांमध्ये गरिबी, बेरोजगारी दूर झाली नाही. देशात सर्व क्षेत्रांत भ्रष्टाचार वाढला. त्यापासून महाराष्ट्रही मुक्त राहिला नाही. महाराष्ट्रातील सत्ता आतापर्यंत काँग्रेस, भाजप व अन्य पक्षांकडे राहिली. मात्र, राज्यातील गरिबांचे प्रश्न न सुटण्यास हेच पक्ष जबाबदार आहेत. बडे भांडवलदार व उद्यागेपतींच्या पाठिंब्यावर ही सरकारे सत्तेवर आली. त्यांनी बडय़ा मंडळींचे हित जोपासण्याचेच काम केले. महाराष्ट्राचा विकास होण्यासाठी भाजप, काँग्रेस व अन्य पक्षांना सत्तेपासून दूर ठेवले पाहिजे, असे मायावती म्हणाल्या.
उत्तर प्रदेशात ४ वेळा बसपचे सरकार आल्यानंतर सर्वसामान्य जनता, उपेक्षितांच्या विकासाकडे आम्ही लक्ष दिले. सत्तेवर आल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू, कांशिराम आदी नेत्यांना मानसन्मान दिला. परंतु विरोधी पक्षीय ही भूमिका पचवू शकले नाहीत. प्रसारमाध्यमांचा वापर व अन्य माध्यमातून विरोधक जनतेस भुलविण्याचा प्रयत्न करतील. परंतु या निवडणुकीत जनतेने सावध राहिले पाहिजे, असे सांगून गेल्या अनेक वर्षांपासून केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळे महागाई वाढत असल्याचा आरोप केला. महाराष्ट्रातील जनतेने काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप आदी पक्षांचा अनुभव घेऊन पाहिला. या वेळी बसपची पाठराखण करावी, असे आवाहनही त्यांनी केले. दलित, भटक्या, अल्पसंख्य, उच्चवर्गातील गरीब जनतेच्या हितासाठी बसप हाच पर्याय आहे, असा दावा मायावती यांनी केला. पक्षाचे येथील उमेदवार रशिद पहेलवान, रोहिदास गंगातिवरे, शरदचंद्र वानखेडे आदींची भाषणे झाली. जालना, औरंगाबाद, बीड, परभणी जिल्ह्य़ांतील पक्षाचे उमेदवार उपस्थित होते.