केवळ ठाणे जिल्ह्य़ाचे विभाजन करुन राज्य सरकारने नगर जिल्ह्य़ाच्या तोंडाला पानेच पुसली आहेत, मुख्यमंत्री व महसुलमंत्र्यांनी नगर जिल्ह्य़ातील जनभावनेचा आदर न केल्यास आंदोलन करावे लागेल, असा इशारा जिल्हा विभाजन कृती समितीचे निमंत्रक व काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विनायक देशमुख यांनी दिला आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठाणे जिल्ह्य़ाच्या विभाजनाला मंजुरी देण्यात आली. या पाश्र्वभूमीवर प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात देशमुख यांनी राज्यातील आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. जनतेच्या भावनेची दखल न घेतल्यामुळे लोकसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा पराभव झाला, मुख्यमंत्री व महसूल मंत्र्यांनी आतातरी जनतेच्या भावनांचा आदर करावा, अन्यथा जिल्ह्य़ातील जनतेला पुन्हा आंदोलन करावे लागेल, असे त्यांनी म्हटले आहे.
राज्यात भौगोलिक दृष्टय़ा सर्वात मोठय़ा नगर व ठाणे जिल्ह्य़ाचे विभाजन करावे अशी मागील २५ वर्षांची मागणी आहे. मात्र केवळ ठाणे जिल्ह्य़ाचे विभाजन करण्यात आले. महसुलमंत्री थोरात जिल्ह्य़ातील असूनही त्यांनी मागणीकडे दुर्लक्ष केले, ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. २० वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी सोनईच्या सभेत व त्यानंतरचे मुख्यमंत्री सुसीलकुमार शिंदे यांनी श्रीरामपूरच्या सभेत नगर जिल्हा विभाजनाचा निर्णय जाहीर केला होता, मात्र जिल्हा मुख्यालयाच्या मुद्यावरुन उत्तरेतील पुढाऱ्यांनी हा विषय हाणून पाडला, याकडे देशमुख यांनी लक्ष वेधले.
आता महसुलमंत्री या नात्याने थोरात यांना विभाजनाचा ऐतिहासिक निर्णय घेण्याची संधी उपलब्ध झाली होती, मात्र त्यांनी ती गमावली, हे जिल्ह्य़ातील जनतेचे दुर्दैव आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

Story img Loader