देशातील, राज्यातील शेतकरी त्रस्त असताना शरद पवार यांना विनोद सुचत आहेत. बोटाला लावलेली शाई पुसून टाकाल, पुन्हा लावून घ्याल. परंतु गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमुळे पुसल्या गेलेल्या कुंकवाचे काय, असा सवाल करीत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना लक्ष्य केले.
महायुतीचे उमेदवार प्रा. रवींद्र गायकवाड यांच्या प्रचारार्थ मंगळवारी रात्री आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. रिपाइं नेते खासदार रामदास आठवले, शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे, सेनेचे उपनेते सुभाष देसाई, नीलम गोऱ्हे, संपर्कप्रमुख विश्वनाथ नेरूरकर, आमदार ओम राजेिनबाळकर, ज्ञानराज चौगुले, बार्शीचे भाऊसाहेब आंधळकर, उमेदवार प्रा. गायकवाड, माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील आदींची उपस्थिती होती.
काँग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांनी देश नासवून टाकला आहे. जे दिल्लीत, तेच उस्मानाबादेत आहे. सत्तेच्या मस्तीत आघाडी सरकारने मोगलाई सुरू केली. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीने शिवरायांना तलवार देऊन मोगलाईविरोधात लढण्यास आशीर्वाद दिला. ती शक्तिदेवता आता महायुतीला नक्कीच बळ देणार आहे. या तेजामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला आडवे केल्याशिवाय आपण आता थांबणार नाही. खुनाचा आरोप घेऊन वावरणाऱ्या पद्मसिंह पाटील यांना एक न्याय आणि जळगावचे सुरेश जैन यांना दुसरा न्याय, अशी अवस्था आहे. जैन यांना जामीन नाकारून तुरूंगात सडवले जात आहे. मग पद्मसिंहांनाच जामीन का, असा सवालही ठाकरे यांनी केला.
राष्ट्रवादीच्या गाडीखाली चिरडून बार्शी तालुक्यात शिवानी भोसले या चिमुरडीचा जीव गेला. मात्र, सत्तेच्या मस्तीत भरधाव सुटलेल्या मस्तवालांना अडविले नाही, तर अशा किती तरी शिवानी मारल्या जातील. त्यामुळे त्वेषाने मतदान करा. पद्मसिंहांविरोधात साचलेला आगडोंब बाहेर येऊ द्या. ज्यांनी कारखाने लुटून खाल्ले, सहकार मोडीत काढला. एवढेच नव्हे, तर ज्यांच्यावर स्वतच्या भावाच्या खुनाचा आरोप आहे, पुन्हा त्यालाच निवडून द्याल, तर तुळजाभवानीही तुम्हाला माफ करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
रिपाइंचे आठवले यांनी, महायुती मुस्लिमद्वेषी नाही, असे सांगून पद्मसिंह पाटलांना पराभूत करून प्रा. गायकवाड यांना विजयी करण्यास भीमसनिक सरसावले असल्याचे म्हटले. मराठय़ांनी पोसलेल्या नेत्यांनीच मराठय़ांना पायदळी तुडविले. त्यामुळेच मराठा समाज आज उघडय़ावर आला असल्याचा आरोप मेटे यांनी केला. बार्शीचे आंधळकर यांनी राजेंद्र राऊत यांच्या समर्थनामुळे महायुतीला शक्ती मिळाली, असे सांगून बार्शीतून २५ हजारांपेक्षा अधिक मताधिक्य महायुतीला मिळेल, असा दावा केला.
माजी आमदार दिनकर माने, शिवसेनेचे सुधीर पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे, संजय िनबाळकर, धनंजय िशगाडे, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख सुरज साळुंके, नृसिंह साखर कारखान्याचे अध्यक्ष शंकर बोरकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे आदी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा