दिल्लीतील महाराष्ट्र सदनात शिवसेनेच्या खासदारांनी जो पराक्रम घडविला, त्यामुळे या पक्षाची केविलवाणी अवस्था झाली. खासदारांना कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणी दिला, असा सवाल करून सेनेच्या मस्तीचा हा परिपाक असल्याचा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला.
जिल्हय़ातील वसमत येथे शुक्रवारी राष्ट्रवादीचा निर्धार मेळावा झाला, त्या वेळी पवार बोलत होते. राज्यात सेनेचे १८ खासदार निवडून आले, मात्र सेनेला केवळ अवजड मंत्रिपद मिळाले. त्यावर सेनेकडून नाराजी व्यक्त होताच ते स्वीकारलेही. त्यांची अवस्था धरले तर चावते सोडले तर पळते अशी झाल्याची चपराक पवार यांनी लगावली. सेनेने आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी काय केले, असा सवाल करीत राज्यात गेल्या १५ वर्षांत आघाडी सरकारने मोठय़ा प्रमाणात विकासकामे केली. राज्यात पाऊस कमी झाल्याने पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण झाले आहे. सर्व काही सुविधा देता येतात, मात्र पाणी न आल्यास टँकरऐवजी रेल्वेने पाणी आणावे लागणार काय, अशी स्थिती निर्माण झाल्याचेही पवार यांनी नमूद केले. राज्यात आघाडी सरकारने आतापर्यंत सर्व समाजाच्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी काम केले. मराठा व मुस्लीम समाजाला आरक्षण मिळवून दिले. धनगर समाजाच्या मागण्यांवर लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत बठक होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीची अध्र्या जागांची मागणी कायम असून यात कोणतीच तडजोड होणार नाही. दोन्ही काँग्रेसची आघाडी न झाल्यास राष्ट्रवादी राज्यातील सर्व जागा लढविणार असल्याचे स्पष्ट केले. दोन्ही काँग्रेसची आघाडी व्हावी, असा आमचा प्रयत्न असून जागावाटपाचा अंतिम निर्णय शरद पवार व काँग्रेस नेत्या सोनिया गांधी घेतील, असेही सांगितले. राज्यमंत्री फौजिया खान, आमदार विक्रम काळे, रामराव वडकुते व जयप्रकाश दांडेगावकर, माजी खासदार गणेशराव दुधगावकर, माजी मंत्री सुरेश वरपुडकर, अरिवद चव्हाण, मुनीर पटेल, दिलीप चव्हाण आदींची उपस्थिती होती.

Story img Loader