राहाता : उद्धव ठाकरे हे आजही आमचे आदरणीय असून आम्हाला आजही त्यांनी बोलवावे, आम्ही जायला तयार आहोत. उद्धव ठाकरे यांच्याविषयी कुणी काहीही बोलले तर ते आम्हाला चालणार नाही़ भाजपच्या नेत्यांना आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनाही आम्ही सांगितले आहे की, उद्धव ठाकरे यांच्याबाबत कोणी काहीही बोलले तर ते खपवून घेतले जणार नाही, असे आमदार दीपक केसरकर यांनी सांगितल़े
सोमय्या नुकतेच उद्धव ठाकरे यांच्याविषयी बोलले होते. मात्र त्यानंतर आपण फडणवीस यांना सांगितले. त्यामुळे यापुढे त्यांनी शब्द दिला आहे, की उद्धव ठाकरे यांच्याबाबत कोणी काही वाईट बोलणार नाही, टीकाटिप्पणी करणार नाही, अशी माहिती दीपक केसरकर यांनी दिली.
मुख्यमंत्री शिंदे गटाचे प्रवक्ते आ. दीपक केसरकर यांनी गुरुवारी रात्री उशिरा साईदरबारी हजेरी लावून साईसमाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर आमदार केसरकर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. आमदार दीपक केसरकर हे निस्सीम साईभक्त आहेत. गुवाहाटीला असतानाही त्यांनी त्याठिकाणच्या साईमंदिरात जाऊन साईबाबांचे दर्शन घेतले होते.
आदित्य यांना खडेबोल
आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना गद्दार म्हणून उल्लेख केल्याने आ. दीपक केसरकर यांनी त्यांना खडेबोल सुनावले. आदित्य ठाकरे खूप लहान आहेत, तुम्ही गद्दार कोणाला म्हणता, तुम्ही बाळासाहेबांचे नातू असाल तर असा शब्द तुमच्या तोंडात येताना दहा वेळा विचार करायला हवा. आम्हीही खूप बोलू शकतो, पण आम्ही बोलणार नाही. मी आदित्य ठाकरेपेक्षा दुप्पट वयाचा माणूस आहे. जेव्हा आदित्य ठाकरे येतात, तेव्हा मी उठून उभा राहातो. कारण तो मान त्यांचा नव्हे तर बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंचा आहे. तुमच्याकडे तो वारसा आल्यामुळे तुम्हाला सुद्धा तो मान मिळाला आहे. आपण कसे बोलावे हे त्यांनी उद्धव साहेबांकडून शिकावे. त्यांनी ते संजय राऊतांकडून शिकू नये, असा खोचक सल्ला त्यांनी आदित्य यांना दिला.