सोलापूर, नगर, जालन्यातील प्रकार
राज्यात सोलापूरसह अहमदनगर, जालना आदी जिल्ह्य़ांमध्ये शेतकऱ्यांना मिळालेली कोटय़वधींची पीक विमा रक्कम त्या त्या जिल्हा मध्यवर्ती बँकांनी सरकारच्या आदेशाला केराची टोपली दाखवत व उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करीत संबंधित शेतकऱ्यांच्या बचत खात्यांवर जमा न करता सर्व रक्कम बेकायदेशीरपणे कर्ज खात्यावर जमा केली आहे. त्यामुळे एकीकडे दुष्काळाच्या झळा भोगत असताना शेतकऱ्यांना जिल्हा बँका आणखी संकटाच्या खाईत लोटत आहेत, असा आरोप शेतकरी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस विठ्ठल पवार यांनी येथे केला.
सोलापूर जिल्ह्य़ातील ५४ हजार ३७१ शेतकऱ्यांना मिळालेली २६ कोटी ८ लाख ४२ हजार २६१ एवढी रक्कम जिल्हा मध्यवर्ती बँकेने परस्पर कर्जखात्यात वळती करून घेतली आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना या परिस्थितीत ‘दुष्काळात तेरावा महिना’ या म्हणीचा प्रत्यय अनुभवास येत आहे. या प्रश्नावर शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेत, संबंधित जिल्हा मध्यवर्ती बँकांसह सहकार आयुक्त कार्यालयावर शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली आसूड मोर्चा काढण्याचा इशारा विठ्ठल पवार यांनी येथे सोमवारी पत्रकार परिषदेत बोलताना दिला. याच पद्धतीने नगर व जालना जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांची मंजूर विमा रक्कम कर्जवसुलीच्या नावाखाली जिल्हा बँकांनी परस्पर काढून घेतली. यात जालना जिल्ह्य़ातील सुमारे ५५ हजार शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक झाल्याचा आरोप त्यांनी केला.
या प्रश्नावर सहकार आयुक्तांच्यावतीने शेतकरी संघटनेचे निवेदन स्वीकारताना प्रशासनातील डी. एम. साळुंखे व धननिधर पाटील या अधिकाऱ्यांनी तातडीने निर्णय घेण्याबाबत सहकार आयुक्तांना माहिती सादर करून संबंधित शेतकऱ्यांना तत्काळ पीक विम्याची रक्कम परत केली जाईल, असे आश्वासन दिल्याचे पवार यांनी नमूद केले.
राज्यात सलग तिसऱ्या वर्षी दुष्काळाची गंभीर स्थिती असताना जिल्हा मध्यवर्ती बँकांनी शेतकऱ्यांच्या पैशांवर डल्ला मारला आहे. यापूर्वी २००९-१० साली सोलापूर जिल्ह्य़ात सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांची पीक विमा रक्कम एक कोटी ८ लाख सोलापूर जिल्हा बँकेने परस्पर कर्ज खात्यांवर वळती करून घेतली होती. त्यामुळे बँकेच्या तत्कालीन सरव्यवस्थापकाची हकालपट्टी करण्यात आली होती, याकडे पवार यांनी लक्ष वेधले.
या वेळी शेतकरी संघटनेचे स्थानिक पदाधिकारी गोरखनाथ घाडगे (सांगोला), नामदेवराव भोसले (माढा), महामूद पटेल (दक्षिण सोलापूर), अशोक शिंगारे आदी उपस्थित होते.
दरम्यान, यासंदर्भात सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता २०११-१२ वर्षांतील राष्ट्रीय कृषी विमा योजना रब्बी हंगामात पीक नुकसान भरपाईची विमा रक्कम, शेतकरी सभासदांच्या थक, चालू व कर्ज सवलत योजनेच्या देय हप्त्यात वसूल करून घेण्याचे आदेश असल्याचे ३१ जानेवारी २०१३ रोजीच्या बँकेच्या सरव्यवस्थापकांच्या पत्रान्वये स्पष्ट करण्यात आले.
पीक विम्याची रक्कम जिल्हा बँकांनी परस्पर वसूल केल्याचा आरोप
सोलापूर, नगर, जालन्यातील प्रकार राज्यात सोलापूरसह अहमदनगर, जालना आदी जिल्ह्य़ांमध्ये शेतकऱ्यांना मिळालेली कोटय़वधींची पीक विमा रक्कम त्या त्या जिल्हा मध्यवर्ती बँकांनी सरकारच्या आदेशाला केराची टोपली दाखवत व उच्च
First published on: 21-05-2013 at 01:16 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crop scheme money recovered by distrect bank