सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात उत्तरापाठोपाठ हस्त नक्षत्राच्या पडलेल्या मोठ्या पावसामुळे यंदाच्या खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे. पिकाच्या नुकसानभरपाईसाठी आतापर्यंत सुमारे सव्वालाख शेतकऱ्यांनी पीक विमा कंपन्यांना नुकसानीची माहिती कळविली आहे. त्यानुसार बाधित शेतकऱ्यांच्या पिकांचे विमा कंपनीकडून पंचनामे केले जात आहेत.पिकांचे नुकसान झालेल्यांमध्ये प्रामुख्याने बार्शी, अक्कलकोट, माढा, मंगळवेढा, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर या तालुक्यांचा समावेश आहे. सोयाबीन, उडीद, तूर, मका, बाजरी, खरीप ज्वारी या पिकांचे नुकसान झाले आहे.

शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यास शेती विमा संरक्षित क्षेत्रात नुकसानभरपाई मिळण्यासाठी संबंधित विमा कंपनीला ७२ तासांत माहिती कळविणे आवश्यक असते. त्यानुसार सुमारे सव्वालाख बाधित शेतकऱ्यांनी पिकांच्या नुकसानीची माहिती कळविल्यानंतर विमा कंपनीकडून नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे केले जात आहेत.यंदाच्या खरीप हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. यात सात लाख ३३ हजार ३०३ शेतकऱ्यांनी या पीक विमा योजनेत सहभाग नोंदविला आहे.प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत विमा संरक्षित क्षेत्रात पिकांचे नुकसान झाल्यास बाधित शेतकऱ्यांना विमा कंपनीकडे नुकसानभरपाईचा दावा करता येतो. त्यासाठी झालेल्या पीक नुकसानीची माहिती ७२ तासांत विमा कंपनीला नोंद करण्यासाठी पीक विमा ॲप किंवा कृषिरक्षक पोर्टल टोल फ्री क्रमांक १४४४७ या प्रणालीचा वापर करता येतो.

हेही वाचा >>>आमदार राम शिंदे यांच्या गाव भेट यात्रेमधून विखे समर्थक गायब

जिल्ह्यात अलीकडे झालेल्या जास्तीच्या पावसामुळे खरीप पिकाचे नुकसान झाले आहे. यातील एक लाख २४ हजार ३०३ शेतकऱ्यांनी विमा कंपनीला एक नुकसानीची पूर्वसूचना कळविली आहे. यात सर्वाधिक बार्शी तालुक्यातील ३८ हजार ४६१ शेतकरी असून, त्या खलोखाल अक्कलकोटमधील ३२ हजार ५६२ शेतकरी आहेत. माढा-१४ हजार ४१९, मंगळवेढा-१० हजार १२१, उत्तर सोलापूर-८८०३, दक्षिण सोलापूर-६४५७, करमाळा-४८१२, सांगोला-२०२५, पंढरपूर-४३२ आणि माळशिरस-३८५ याप्रमाणे बाधित शेतकऱ्यांनी आपल्या पीक नुकसानीची माहिती विमा कंपनीला कळविली आहे.

या संदर्भात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गवसाने यांनी, पीक नुकसानीची माहिती शेतकऱ्यांनी विमा कंपनीला कळविल्यानंतर विमा कंपनीने पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू केले आहेत. त्यासाठी कृषी विभागाचे अधिकारीही कार्यरत असून, पंचनाम्यांनंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वेळेत मिळण्यासाठी पाठपुरावा केला जात असल्याचे सांगितले.