विजेचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह आलेल्या अकाली पावसाने गेल्या आठवडय़ात जिल्ह्य़ाच्या बहुतांश भागाला चांगलेच झोडपून काढले.  चिखली तालुक्यातील करवंड, वरवंड, पेठ, उंद्री व मेहकर तालुक्यातील जानेफळ, उटी, घुटी, गोमेधर, देळप, घाटनांद्रा, वरवंड, बोथा आदि ठिकाणी बोराएवढय़ा गारा पडल्या आहेत.
 अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे शेकडो हेक्टर क्षेत्रावरील गहू, मका, सुर्यफू ल, हरभरा व फळ बागाचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिसकावून घेतल्यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा संकट कोसळले आहे. वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्यामुळे अनेक रस्त्यांवरची वाहतूक ठप्प होती. या पावसाचा सर्वाधिक फटका चिखली तालुक्याला बसला आहे.
 गतवर्षी वरुणराजाच्या कृपेमुळे जिल्ह्य़ात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. विहिरी व प्रकल्प तुडुंब भरले असून नदीनाले अजूनही वाहत आहेत. मुबलक पाणी असल्यामुळे यावर्षी असंख्य शेतकऱ्यांनी हजारो हेक्टर क्षेत्रावर गहू, हरभरा, मका, सूर्यफूल व भाजीपाल्याची लागवड केली होती. खरिपाची तूट रब्बीत भरून काढण्यासाठी शेतकरी रात्रंदिवस सिंचन करून काबाडकष्ट करीत होते. शेकडो हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिकापैकी गहू, हरभरा व मका ही काढण्याच्या बेतात होती, परंतु मंगळवारी मध्यरात्री आलेल्या अकाली पावसाने शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले आहे. लोणार, देऊळगावराजा, सिंदखेडराजा तालुके वगळता जिल्ह्य़ाच्या उर्वरित तालुक्याला अवकाळी पावसाने चांगलाच तडाखा दिला. त्याचा सर्वाधिक फटका मेहकर व चिखली तालुक्याला बसला.
त्यात चिखली तालुक्यातील करवंड, वरवंड, पेठ, उंद्री, लाखनवाडा व मेहकर तालुक्यातील जानेफळ, उटी, घुटी, गोमेधर, देळप, वरवंड, बोथा आदि ठिकाणी बोराएवढय़ा गारा पडल्या. अनेक गावात व शेतात गारांचा खच पडलेला होता.
वादळी वाऱ्यामुळे शेकडो हेक्टर क्षेत्रावरील गहू झोपला असून मका, हरभरा, सुर्यफूल व भाजीपाल्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. वादळी वारा व पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या फळबागा उध्वस्त झाल्या आहेत. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. बुलढाणा, मोताळा, मलकापूर, नांदुरा, मेहकर व चिखली तालुक्यातील अनेक गावांना अवकाळी पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. अनेक रस्त्यावरील वाहतूक ठप्प व वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे अनेक गावांना रात्री अंधारात काढावी लागली. रब्बी उत्पादक शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी तातडीने सव्‍‌र्हे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

Story img Loader