जून महिन्यात आतापर्यंत झालेल्या अतिवृष्टीने विदर्भात १० लाख हेक्टरमधील पिके बुडाली असून २५ लाख हेक्टरमधील उभी पिके धोक्यात आहेत. विदर्भातील शेतकऱ्यांना २० हजार कोटी रुपयांचा फटका बसला आहे.
मागील २ जूनपासून विदर्भात सतत पाऊस पडत आहे. अति पाऊस व पुरामुळे विदर्भात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली असून संपूर्ण विदर्भात १० लाख हेक्टरमधील खरीप पिके नष्ट झाली आहेत. २५ लाख हेत्टरमधील कापूस, सोयाबीन व धानाचे पीक नापिकीग्रस्त झाले असून मोठय़ा प्रमाणात होत असलेल्या पावसामुळे ही पिकेही बुडण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर्षी महिनाभरात पडणारा १०० मिलीमिटर पाऊस एकाच दिवशी पडला असून मागील गुरुवारी चंद्रपूर येथे एकाच दिवसात सुमारे ३०० मिलीमिटर पावसाची नोंद झाली. असाच पाऊस संपूर्ण विदर्भात पडत असून चार महिन्यांतील पावसाची सरासरी चार आठवडय़ातच पूर्ण झाल्याने ही परिस्थिती उद्भवली. सततची झड व पुराच्या तडाख्याने हजारो घरांचे नुकसान झाले.
अनेक ठिकाणी प्रशासकीय अधिकारी पोहोचलेच नसून परिस्थितीची गंभीरता त्यांना कळलेली नाही. या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण शनिवार व रविवारी पूरग्रस्त भागाचा हवाई दौरा करणार आहेत. यावर्षी शेतकऱ्यांनी दुबार व तिबार पेरणी करण्याची वेळ आली असून कोरडवाहूसह ओलिताची सोय असलेल्या अल्पभूधारकांसह मोठे शेतकरीही प्रचंड अडचणीत आले आहेत. अतिपावसामुळे कर्जबाजारी शेतकरी विवंचनेत अडकला आहे. मागील दोन दिवसांत मंगी येथील संतोष सिडाम व ठाणेगाव येथील अनिल मरापे या दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. विदर्भात नगदी पीक कापूस व सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले आहे. पर्यायी पिके घेण्याच्या स्थितीतही शेतकरी नाहीत.
शासनाने २५ हजार रुपये हेक्टर मदत शासनाने कुठलीही अट न घालता सरसकट प्रत्येक शेतकऱ्याला तात्काळ द्यावी, अशी मागणी विदर्भ जनआंदोलन समितीचे किशोर तिवारी यांनी केली आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत, नवीन पीक कर्ज, सहा महिन्यांसाठी अन्नसुरक्षा, सर्व शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत उच्चशिक्षण व मोफत आरोग्याची सुविधा द्यावी. सरकारने विशेष अनुदान द्यावे व त्यासाठी कृषी खात्याने विशेष योजना सुरू करण्याची गरज आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.

Story img Loader