सांगलीत दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यात अंतिम टप्प्यात आलेल्या रब्बी पिकाबरोबरच द्राक्षांचे कोटय़वधीचे नुकसान केले आहे. नुकसानीची माहिती घेण्यासाठी कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना शासनाने सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात ५.४ मिमी अवकाळी पावसाची नोंद झाली आहे. शिमग्याच्या मोसमात मिरगाचे हवामान असल्यासारखे वातावरण होते. रविवारी दिवसभर जिल्ह्यात पावसाच्या थांबून थांबून सरी कोसळत होत्या.
मार्च महिन्यात शिमगा असल्याने सुगीचा मोसम सगळीकडे सुरू आहे. रब्बी ज्वारीची काढणी, मळणी, द्राक्षाची काढणी, गहू, हरभरा, करडई या पिकांची काढणी बहुतेक भागात सुरू असतानाच अवकाळी पावसाने जिल्ह्यात थमान घातले आहे. शनिवारी सायंकाळपासून कडेगाव, पलूस या तालुक्यात, तर मध्यरात्रीपासून जिल्ह्यात सर्वच ठिकाणी पावसाने प्रारंभ केला आहे. काल सकाळपर्यंत जिल्ह्यात सरासरी ५.४ मिलिमीटर एवढी पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद वाळवा येथे ९.७ मिलीमीटर झाली असून अन्य ठिकाणी नोंदला गेलेला पाऊस असा- मिरज ५, तासगाव ४.६, कवठे महांकाळ २.६, जत २.८, विटा ६.५, आटपाडी २, पलूस ५.८ कडेगाव ९.६ मिलीमीटर एवढा पाऊस काल सकाळी ८ वाजेपर्यंत नोंदला गेला. या अवकाळी पावसाच्या हजेरीने शेतकरी वर्ग हतबल झाला असून ऐन सुगीवेळी अवकाळीने हजेरी लावल्याने तोंडचे पाणी पळाले आहे.
रब्बी पिकाच्या काढणीचा काळ असल्याने उभ्या असणाऱ्या शाळू पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाने जमीन भिजल्याने उभा शाळू जमीनदोस्त होत आहे. तसेच गव्हाच्या लोंब्याही जमिनीवर पडत आहेत. हरभरा, करडई या पिकांचीही हानी मोठय़ा प्रमाणात झाली आहे. नुकसानीचा अंदाज येण्यास प्रत्यक्षात आणखी चार दिवस लागणार असले तरी यंदाच्या अवकाळी पावसाने शेतीचे नुकसान कोटय़वधीच्या घरात पोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
द्राक्ष पिकाचे अवकाळीने मोठे नुकसान झाले असून निर्यातक्षम द्राक्ष पिकाबरोबरच स्थानिक बाजारासाठी आणि बेदाण्यासाठी तयार करण्यात आलेल्या द्राक्षाची हानी होण्याची भीती व्यक्त होत आहे. बेदाणा निर्मितीसाठी मिरज-पंढरपूर मार्गावर नागज, जुनोनी या भागात मोठय़ा प्रमाणात माल शेडवरील रँकवर टाकण्यात आला असून अचानक हवेत आर्द्रता निर्माण झाल्याने बेदाण्याची प्रतवारी खराब होणार आहे. बेदाणा निर्मितीचा कालावधी वाढण्याबरोबरच बेदाणा काळा पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.
वेलीवर असणाऱ्या द्राक्षातील साखर अवकाळीमुळे झाडात परत जाणार असल्याने वजनात घट येण्याबरोबरच गोडीही कमी होणार आहे. तसेच द्राक्ष घडात पावसाचे पाणी साचल्याने मणी तडकण्याचा धोका आहे. पावसानंतर तत्काळ जर तीव्र स्वरूपाचा सूर्यप्रकाश पडला तर मणी तडकण्याची जास्त शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा