सोलापूर : उजनी धरणातील पाणीसाठा झपाट्याने खालावत असताना दुष्काळात तेरावा महिना यावा त्याप्रमाणे याच उजनी जलाशयाच्या उजव्या कालव्याचा उंच सेतू फुटल्यामुळे पाण्याची प्रचंड गळती झाली. माळशिरस तालुक्यातील संगमजवळ हा प्रकार घडला असून तब्बल २४ तासांनंतर पाण्याची गळती रोखण्यासाठी जलसंपदा खात्याची यंत्रणा जागी झाल्याचे दिसून आले. पंढरपूर-मंगळवेढा भागासाठी कालव्याद्वारे सोडलेल्या पाण्याची मोठ्या प्रमाणावर गळती होताना तेथे धबधब्याचे स्वरूप आले होते.
हेही वाचा >>> “असं अपत्य तुम्हाला मान्य आहे का?”, मोदींचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा RSSला सवाल
मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी भागातील शेतीपिकांसाठी उजनी उजव्या कालव्यावाटे पाणी सोडले जात असताना कालव्याचा सेतू फुटून पाणी गळती सुरू झाली. गळतीमुळे धबाधब्यासारखे खाली कोसळणारे पाणी कालव्याच्या परिसरातील शेतांमध्ये घुसले. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांवर संकट कोसळले. तर मंगळवेढा भागातील शेतीपिके पाण्याअभावी करपून चालली असताना त्यात कालवा फुटल्यामुळे मंगळवेढा भागातील शेती हक्काच्या पाण्यावाचून धोक्यात आली आहे. यासंदर्भात बाधित शेतकऱ्यांपैकी गणेश इंगळे यांनी जलसंपदा विभागाच्या गलथान कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला.
हेही वाचा >>> “मी हिंदुत्व सोडलं म्हणता, मोहन भागवत मशिदीत जाताना काय सोडतात?” उद्धव ठाकरेंचा थेट प्रश्न
जलसंपदा विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क साधूनही प्रतिसाद मिळाला नाही. माहिती प्राप्त होताच संबंधित यंत्रणा धावून येत कालव्याची गळती दूर करणे अपेक्षित होते. परंतु त्याचे गांभीर्यच नसल्याने २४ तासांपेक्षा अधिक वेळ फुटलेल्या कालव्यातून कोट्यवधी लिटर पाणी वाया गेल्याचे इंगळे यांनी सांगितले. एकीकडे सध्याच्या तीव्र उन्हाळ्यात उजनी धरणातील पाणीसाठा जलसंपदा विभागाच्याच नियोजनशून्य कार्यपद्धतीमुळे संपत आला आहे. चालू मे महिन्यात पाणीसाठा आणखी खालावून परिस्थिती गंभीर होण्याची भीती व्यक्त होत असताना दुसरीकडे फुटलेल्या कालव्याची वेळेवर दुरूस्ती न होता २४ तासांपेक्षा अधिक विलंब झाला आहे. याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी व्हावी , अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे.