सांगली : पोलीसांच्या मारहाणीत मृत्यू झालेल्या अनिकेत कोथळे याचा मृतदेह पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने १८० फूट खोलीच्या दरीत जाळण्यात आला अशी साक्ष पंचनाम्यावेळी उपस्थित असलेले वरिष्ठ स्तर न्या. मनोजकुमार बुधवंत यांनी मंगळवारी सुनावणीवेळी दिली.

सांगलीत चार वर्षापुर्वी गाजलेल्या कोथळे खूनखटल्याची सुनावणी जिल्हा सत्र न्यायालयात सुरु आहे. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे सरकार पक्षातर्फे काम पहात आहेत. आज अनिकेत कोथळे खून खटल्यात अनिकेतच्या जळालेल्या प्रेताचे इन्क्वेस्ट पंचनामा करणारे वरिष्ठ स्तर न्या.बुधवंत तसेच अनिकेतच्या जळालेल्या मृतदेहाच्या अस्थिंचे नमुने डीएनए चाचणीसाठी नेणाऱ्या पोलीस निरीक्षक ज्योती आमणे यांची साक्ष झाली. या खून खटल्यात संशयित अरुण लाड याने पोलिसांना आंबोलीतील अनिकेतला जाळलेले घटनास्थळ दाखवले होते. त्या ठिकाणी अनिकेतच्या प्रेताची जळालेली हाडे, राख मिळून आले होते. न्या. बुधवंत यांनी अनिकेतच्या जळालेल्या प्रेताचा इन्क्वेस्ट पंचनामा केला होता. यात  साक्षी दरम्यान न्या. बुधवंत यांनी १२८ फूट खोल दरीत अनिकेतचे प्रेत जाळले होते असे सांगितले . तर अनिकेतच्या जळालेल्या हाडांचे डीएनए नमुने पुणे येथील प्रयोगशाळेमध्ये नेणाऱ्या पोलीस निरीक्षक श्रीमती आमणे यांची महत्वपूर्ण साक्ष झाली. तर अस्थिंचे नमुने आमणे यांनी पोहोचवले नाहीत असे बचावपक्षाचे म्हणणे होते. दोन्ही साक्षीचा सरतपास व उलटतपास आज पूर्ण झाला. यादरम्यान सरकारपक्ष व बचावपक्षात वेळोवेळी खडाजंगी झाली.  यावेळी जिल्हा सरकारी वकील अरविंद देशमुख, सीआयडीचे तत्कालीन उपअधीक्षक व तपासाधिकारी मुकुंद कुलकर्णी , सीआयडीच्या उपअधीक्षक आरिफा मुल्ला यांनी सरकारी पक्षाला सहकार्य केले.

Story img Loader