विदर्भात वितरण हानी शून्य असल्याने येथे खुल्या बाजारातील वीज खरेदी करताना आकारण्यात येणारे वितरण हानीअंर्तगत शुल्क घेण्यात येणार नाही, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
‘नागपूर फर्स्ट’ आणि ‘सीआयआय’ यांच्या संयुक्त विद्यमाने नागपुरात परिषद आयोजित करण्यात आली होती. याच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.
विदर्भातील उद्योजकांना खुल्या बाजारातून वीज खरेदीची परवानगी देण्यात आली आहे, परंतु अशी वीज खरेदी करताना वितरण हानी अंर्तगत शुल्क (क्रास सबसिडी चार्जस) आकारण्यात येतात. यामुळे महावितरण किंवा खासगी वीज कंपन्या यातील दरात फारशी तफावत राहत नाही. विदर्भात मोठय़ा प्रमाणात खासगी वीज निर्मिती प्रकल्प आहेत. या भागात वितरणातील हानी नाही. तेव्हा येथे ‘क्रॉस-सबसिडी’ आकारण्यात येणार नाही. त्यामुळे विजेचे दर खूप खाली येतील आणि यामुळे खुल्या बाजारातून वीज घेणाऱ्यांना लाभ होईल, असेही ते म्हणाले.
विदर्भाचा मुख्यमंत्री असणे हेच मोठे प्रोत्साहन आहे. येथे गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ आहे, असेही ते म्हणाले. भौगोलिक रचना बघता नागपूर आणि नागपूर विभागाला उत्पादन, दळणवळण आणि आतिथ्य उद्योग केंद्र म्हणून विकसित केले जाऊ शकते. अमरावती विदर्भात मोठे कृषीक्षेत्र आहे. तेथे वस्त्रोद्योगक्षेत्र विकसित केले जाणार आहे. विदर्भात गुंतवणुकीसाठी हीच योग्य वेळी आहे. पाच वर्षांनी गुंतवणूकदारांना येथे जागा उपलब्ध होणार नाही, असे ते म्हणाले.