लातूर – भाजपतील अंतर्गत संघटनात्मक निवडणुकांची तयारी सुरू झाली असून गुढीपाडव्यानंतर पंधरा दिवसात लातूर जिल्ह्यातील ग्रामीण व शहर जिल्हाध्यक्षाची निवड होण्याची शक्यता आहे. लातूर जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी २०१९ च्या निवडणुकीत अहमदपूर विधानसभा मतदारसंघातून बंडखोरी करून निवडणूक लढवलेले दिलीप देशमुख यांना भाजपने ग्रामीण जिल्हाध्यक्ष पद देऊ केले होते. यावेळी भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांनी अहमदपूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती निवडणुकीच्या दरम्यान त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. त्यांचे निलंबन रद्द करून जो न्याय दिलीप देशमुख यांना दिला तोच न्याय गणेश हाके यांना देणार का? असा सवाल हाके समर्थक उपस्थित करत आहेत.
या व्यतिरिक्त लातूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व भाजपाचे निष्ठावान कार्यकर्ते रामचंद्र तिरुके ,आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांचे बंधू अरविंद पाटील निलंगेकर ,आमदार अभिमन्यू पवार समर्थक भीमाशंकर राचट्टे व संतोष मुक्ता अहमदपूरचेच भारत चामे आदि नावाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यातून पक्षश्रेष्ठी कोणता निर्णय घेणार याकडेही लक्ष लागले आहे.
याच निवडणुकीत भाजप शहर जिल्हाध्यक्ष पदाची ही निवडणूक होईल. लातूर मनपाचे माजी उपमहापौर देविदास काळे हे भाजप शहर जिल्हाध्यक्ष आहेत. लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपात दाखल झालेल्या व लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवलेल्या डॉक्टर अर्चना पाटील चाकुरकर यांचे शहर जिल्हाध्यक्षपदी नाव चर्चेत आहे याशिवाय विवेक वाजपाई, शैलेश लाहोटी, शिवा शिसोदिया, शैलेश गोजमगुंडे, रागिणी यादव, प्रेरणा होनराव आदी नावेही चर्चेत आहेत पक्षश्रेष्ठी याबद्दल काय निर्णय घेतात याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.