शेगावी माघमासी। वद्य सप्तमी त्या दिवशी। हा उदय पावला ज्ञानराशी।। पदनताते तारावया। दासगणू महाराज रचित श्री विजय ग्रंथात संत गजानन महाराज प्रकट झाले तो क्षण असा शब्दबद्ध करण्यात आला आहे. इंग्रजी दिनदर्शिकेनुसार तो दिवस म्हणजे २३ फेब्रुवारी १८७८ होय. १३ फेब्रुवारीच्या मुहूर्तावर आलेला यंदाचा प्रकट दिन १४५ वा आहे. महाराजांनी १९१० मध्ये संजीवन समाधी घेतली. मात्र, आजही महाराज पुण्यनगरी शेगावी वास करून आहेत या लाखो भक्तांच्या श्रद्धेत तसूभरही घट झाली नाहीये.
हेही वाचा- भंडारा : करायला गेला एक अन् झाले काही भलतेच; शेतकऱ्याने पिकावर केली देशी दारूची फवारणी, पण..
आज, सोमवारी माध्यान्ही शेगावात असलेली लाखांवर भक्तांची मांदियाळी आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून डेरे दाखल झालेल्या ११०० भजनी दिंड्या लक्षात घेतल्या तर ही श्रध्दा आणि ‘श्रीं’वरील भाविकांचा विश्वास अढळ, अभंग असल्याचे सिद्ध होते. दुपारी एक वाजेपर्यंत विदर्भ पंढरीत लाखांवर भाविकांची मांदियाळी जमल्याचे चित्र आहे. यामुळे समाधी स्थळ व मंदिर परिसर आबालवृद्ध भाविकांनी फुलून आणि गजबजून गेला आहे. दर्शनबारी व मुखदर्शनासाठी हजारो भाविकांच्या दिर्घ रांगा लागल्या. दर्शनासाठी किमान पाच तास लागत आहे. मुखदर्शनदेखील सहज होत नसल्याचे चित्र आहे. भाविकांची अलोट व उत्तरोत्तर वाढत जाणारी गर्दी ध्यानी घेऊन दर्शनासाठी मंदिर चोविस तास उघडे आहे. याप्परही दर्शनाच्या रांगाची लांबी कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. रेल्वे व बसस्थानक ते गजानन महाराज संस्थान दरम्यानचा मार्ग ‘मुंगीलाही शिरायला जागा नाही’ या धर्तीवर गजबजलेला आहे.
हेही वाचा- नागपूर: बुथपासून मतदान केंद्रापर्यंत सर्व काही, असे आहे भाजपचे वॉर रूम
वर्षभर येणाऱ्या भाविकांच्या सोयी सुविधांसाठी झटणाऱ्या संत गजानन महाराज संस्थानचे ब्रीदवाक्य ‘सर्वे भवन्तु सुखिन:’ हे आहे. त्याला ‘शिवभावें जीवसेवा’ अन् ‘सेवा हीच साधना’ या व्रताची जोड देणाऱ्या संस्थानाने भाविकांसाठी सर्वोतोपरी सुविधा उपलब्ध केल्या आहेत. भाविकांची गर्दी होईल हे लक्षात घेता एकेरी मार्ग करण्यात आला आहे. त्यामध्ये श्रींचे समाधी दर्शन व्यवस्था, श्री मुख दर्शन व्यवस्था, श्री महाप्रसाद, श्री पारायण कक्ष मंडप इत्यादी व्यवस्था संस्थांनच्यावतीने करण्यात आली आहे. महाप्रसादाचे उत्तम नियोजन करण्यात आले आहे. दिंडीत सहभागी वारकऱ्यांसाठी संस्थानच्यावतीने वैद्यकीय सेवा, महाप्रसाद व्यवस्था आहे. सहभागी दिंड्यांना नियमांची पूर्तता केल्यावर १० ताळ, वीणा, मृदुंग, हातोडी, ६ पताका, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, तुकाराम गाथा देण्यात येत आहे.