काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागांना तडाखा बसला. अनेक दुर्घटना घडल्या, तर अनेक गावांचा संपर्क तुटला होता. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहरालाही महापुराचा फटका बसला. पुराचं पाणी शिरल्यानं शहरं पाण्यात बुडालं. यामुळे मोठं नुकसान झालं असून, आता मदत कार्य सुरू आहे. पुराचा फटका बसलेल्या चिपळूणमधील नागरिकांना मदत करण्यासाठी अनेक हात पुढे आलेले आहेत, तर सरकारकडून मदत जाहीर करण्यात आली. यातच आता पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शिवसैनिकांकडून मुंबईतील व्यापाऱ्यांकडून वर्गणी गोळा केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. यावरून माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनेला सवाल करत संताप व्यक्त केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चिपळूणमध्ये नदीला पूर आल्यानं पूरपरिस्थिती उद्भवली होती. पहिल्या मजल्यांपर्यंत पाणी पोहोचलं होतं. यामुळे लोकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. जीवनावश्यक वस्तुंबरोबरच इतर सामानाचीही नासाडी झाली आहे. दरम्यान, चिपळूण शहरातील पूर ओसरल्यानंतर मदत कार्य सुरू असून, शासकीय यंत्रणांबरोबरच स्वयंसेवी संस्था आणि इतर नागरिक वेगवेगळ्या स्वरूपात मदत करत आहेत.

आणखी वाचा- पूरग्रस्तांना दिलेले चेक परत घेतले? अनिल परब यांनी दिलं स्पष्टीकरण; म्हणाले…

मदत कार्य सुरू असतानाच माजी खासदार निलेश राणे यांनी ट्वीट करत शिवसेनेवर संताप व्यक्त केला आहे. “मुंबईतल्या एका मराठी व्यापाऱ्याचा फोन आला. त्याने विचारले चिपळूणला जो पूर आला, त्यासाठी शिवसैनिकांना काही वेगळी वर्गणी जमा करायला सांगितली आहे का? कारण प्रत्येक दुकानात जाऊन आम्हाला चिपळूणला मदत करायची आहे, असं सांगून व्यापाऱ्यांकडून वर्गणी जमा करण्याचं काम मुंबईत सुरू आहे. काय चाललंय?”, असा सवाल निलेश राणे यांनी केला आहे.

अतिवृष्टी झाल्यानं कोकणातील रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांत प्रचंड नुकसान झालं आहे. रत्नागिरीतील चिपळूणबरोबरच रायगड जिल्ह्यातील महाड आणि कर्जतमध्येही भयावह परिस्थिती निर्माण झाली होती. पावसाने विश्रांती घेतल्यानं आता वेगवेगळ्या स्वरूपात मदत केली जात असून, राजकीय पक्षांसह सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था मदतीसाठी पुढे येताना दिसत आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crowdfunding for flood hit people chiplun flood donation shivsena activists nilesh rane criticised shiv sena bmh