नववर्षांच्या स्वागतासाठी महाबळेश्वर, पाचगणी ही पर्यटनस्थळे पर्यटकांनी बहरली आहेत. नव्या वर्ष स्वागतासाठी शनिवार आणि रविवार अशी जोडून सलग सुट्टी आल्याने आजपासूनच पर्यटकांची गर्दी झाली आहे. महाबळेश्वरकडे येणाऱ्या रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. दरम्यान येथील बाजारपेठा, हॉटेलदेखील पर्यटकांच्या स्वागतासाठी आकर्षक विद्युत रोषणाईने सजले आहेत.
महाबळेश्वर, पाचगणी या गिरिस्थान पर्यटनस्थळांवर नववर्षांच्या स्वागतासाठी दरवर्षी हजारो पर्यटक येत असतात. यंदा तर नववर्षांच्या स्वागतावेळी जोडून सुट्टी आल्यामुळे ही गर्दी मोठी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे शुक्रवारीच महाबळेश्वर, पाचगणीमध्ये मोठय़ा संख्येने पर्यटक आले आहेत. पर्यटकांनी सध्या येथील वेण्णालेक, विविध पॉईंट, पाचगणी टेबल लॅन्ड आदी स्थळे फुलून गेली आहेत. दरम्यान येथील बाजारपेठा, हॉटेलदेखील पर्यटकांच्या स्वागतासाठी आकर्षक विद्युत रोषणाईने सजले आहेत. अनेक हॉटेल ऑनलाइन आरक्षित झाली आहेत. वाई, जावळी परिसरातील शेतघराला (फार्म हाऊस) पर्यटक प्राधान्य देत आहेत. वाई पाचगणी महाबळेश्वरचे रस्ते, पसरणी घाट गर्दीने फुलून गेला आहे. वाहने वाढल्याने सर्वत्र वाहतूक कोंडी होत आहे.