जम्मू- काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा येथे गुरुवारी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात 39 जवान शहीद झाले. या हल्ल्यात सांगली जिल्ह्यातील सीआरपीएफ जवान राहुल कारंडेदेखील शहीद झाल्याचं बोललं जात होतं. मात्र मिळालेल्या माहितीनुसार, राहुल कारंडे यांचा पुलवामा हल्ल्यात नाही, तर पठाणकोट येथे अपघाती मृत्यू झाला आहे. तहसीदार शिल्पा ठोकडे यांनी ही माहिती दिली आहे. राहुल कारंडे कवठेमडंकाळ येथील विठुरायाची वाडी गावचे होते. दरम्यान पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात बुलढाण्यातील दोन जवान शहीद झाले आहेत. नितीन राठोड आणि संजय राजपूत अशी या जवानांची नावे असून त्यांच्या गावात शोककळा पसरली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तब्बल ३५० किलो स्फोटकांनी भरलेल्या ट्रकद्वारे जैश ए मोहम्मदच्या अतिरेक्याने गुरुवारी पुलवामा जिल्ह्य़ात चढविलेल्या भीषण आत्मघातकी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ३९ जवान शहीद झाले असून २० जखमी झाले आहेत. गेल्या दोन दशकांतील हा सर्वात मोठा हल्ला आहे. या हल्ल्याने देशभर संतापाची लाट उसळली असून या जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, असा गर्भित इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. आदिल दार असे आत्मघातकी हल्ला चढविणाऱ्या अतिरेक्याचे नाव आहे. तो दक्षिण काश्मीरमधील काकेपुराचा आहे. २०१८मध्ये तो जैश ए महम्मदमध्ये सामील झाला होता.

सुटी संपवून सेवेत रुजू होणाऱ्या २,५४७ जवानांना ७० वाहनांतून नेले जात होते. दर खेपेस हजार जवानांना नेले जाते, पण यावेळी ही संख्या दुपटीपेक्षा जास्त होती. पहाटे साडेतीन वाजता जम्मूहून हा ताफा निघाला आणि सूर्यास्ताआधी तो श्रीनगरला पोहोचणे अपेक्षित होते. श्रीनगर-जम्मू महामार्गावर अवंतीपुरा येथील लट्टूमोड येथे हा ताफा पोहोचला असताना हा हल्ला झाला. जवानांच्या ताफ्यावर गोळीबारही झाला आणि क्षणार्धात स्फोटक भरलेला ट्रक त्या ताफ्यात धडकल्याने भीषण स्फोट झाला. त्यात ७६व्या बटालियनच्या वाहनाच्या चिंधडय़ा उडाल्या. अन्य काही वाहनांचीही मोठी हानी झाली आहे. काही वाहनांवर गोळीबाराच्या खुणा आहेत. त्यामुळे परिसरात काही अतिरेकी लपून बसले असावेत आणि त्यांनी हा गोळीबार केला असावा, असा तर्क आहे. हल्ला झालेले ठिकाण श्रीनगरहून ३० कि.मी.वर आहे.

अत्यंत कडेकोट बंदोबस्त असलेल्या या महामार्गावरून इतक्या प्रमाणातील स्फोटके नेणारा ट्रक निर्वेधपणे कसा काय जाऊ शकला, असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित झाला आहे. त्याची चौकशी केली जाईल, असे केंद्रीय राखीव पोलीस दलाकडून सांगण्यात आले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crpf jawan rahul karande died in accident