राज्यात शिक्षेचे प्रमाण कमी, हा प्रश्न महत्वाचा आहे. सरकारी वकिलांची नेमणूक ही गृहखात्याच्या अखत्यारीमध्ये आली तर पोलीस व सरकारी वकील यांच्यात योग्य समन्वय साधेल. शिक्षेच्या प्रमाणात नक्कीच वाढ होईल, असे मत गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी मंगळवारी व्यक्त केले.
दहाव्या महाराष्ट्र राज्य पोलीस सेवा स्पर्धाचे उद्घाटन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले; त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाळ, माजी पोलीस महासंचालक ए. व्ही. कृष्णन, राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीआयडी) प्रमुख अपर पोलीस महासंचालक एस. पी. यादव, पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ आदी पोलीस अधिकारी उपस्थित होते.
गुन्ह्य़ाच्या तपासात आपण पुढे आहोत. मात्र, शिक्षेचे प्रमाण कमी हा महत्त्वाचा प्रश्न असून याबाबत शासनाने काही सूचना केल्या आहेत. त्या अमलात आणल्या तर नक्कीच शिक्षेच्या प्रमाणात वाढ होईल, असे सांगून पाटील म्हणाले की, काही राज्यात सरकारी वकिलांची नेमणूक ही शासनाकडून होते. महाराष्ट्रातही सरकारी वकिलांची नेमणूक ही गृहखात्याकडून झाली तर पोलीस व सरकारी वकील यांच्यात समन्वय निर्माण होईल. त्यातून शिक्षेचे प्रमाण वाढेल, असे त्यांनी स्पष्ट केले. सध्या गुन्हेगारीची संकल्पना बदलत चालली आहे. बदलत्या गुन्हेगारीला तोंड देणे हे आपल्या पुढील आव्हान आहे. गुन्हेगारी बाबतची माहिती एकत्र करण्यासाठी देशपातळीवर सीसीटीएनएस ही यंत्रणा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गुन्हेगाराची माहिती एका क्लिकवर मिळेल. गुन्ह्य़ाचे स्वरुप बदलत असल्यामुळे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा लागत आहे.  देशातील नागरिकांची माहिती आधार कार्डमुळे एकत्रित होणार आहे. त्याचा फायदा पोलिसांना नक्कीच होईल. प्रत्येक पोलीस ठाण्याला तपासासाठी दिला जाणारा पंचवीस हजाराचा तपास निधीबाबत या अधिवेशनात सकारात्मक निर्णय घेतला जाईल.  त्याच बरोबर पुण्यात ‘श्वान’ पथकासाठीच्या इमारतीचा निधीसाठीचा निर्णय घेतला जाईल, असेही पाटील यांनी नमूद केले.
दयाळ म्हणाले की, प्रत्येक पोलीस ठाण्यासाठी जाहीर केलेला तपास निधी मिळावा यासाठी या अधिवेशनात प्रयत्न करावेत. त्याच बरोबर हा तपास निधी गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनिटनाही द्यावा. त्याच बरोबर पुण्यात श्वान पथकासाठीची प्रस्तावित इमारत आणि नवीन तीनशे श्वान घेण्याचा प्रस्ताव शासनाकडे आहे.  तपासामध्ये उणिवा असल्यामुळे राज्यात शिक्षेचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे तपासी अंमलदारांना प्रशिक्षण देण्यासाठी निधीची आवश्यकता आहे. यासाठी निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी त्यांनी केली. एस. पी. यादव यांनी आभार मानले.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘फेसबुक’ अटकप्रकरणी  अहवाल आल्यानंतर बोलू
बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर राज्यात पाळल्या गेलेल्या बंदबाबत फेसबुकवर भाष्य करणाऱ्या पालघर येथील तरूणीस अटक केलेल्या प्रकरणाची चौकशी कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक करत आहेत. त्यांचा अहवाल शनिवापर्यंत येणे अपेक्षित आहे. त्यानंतरच या प्रकरणावर बोलणे उचित ठरेल, असे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.

‘फेसबुक’ अटकप्रकरणी  अहवाल आल्यानंतर बोलू
बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर राज्यात पाळल्या गेलेल्या बंदबाबत फेसबुकवर भाष्य करणाऱ्या पालघर येथील तरूणीस अटक केलेल्या प्रकरणाची चौकशी कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक करत आहेत. त्यांचा अहवाल शनिवापर्यंत येणे अपेक्षित आहे. त्यानंतरच या प्रकरणावर बोलणे उचित ठरेल, असे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.