छत्रपती संभाजीनगर : तुळजाभवानी मंदिराच्या कर्णशिळांना तडे गेल्याचे समोर आल्यानंतर कळस उतरुन नवे बांधकाम करण्याबाबतचा निर्णय भारतीय पुरातत्त्व विभागातील अधिकाऱ्यांच्या तपासणीनंतर घेतला जाईल असे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी सांगितले. मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना या कामाची आवश्यकता आहे का हे तपासण्यासाठी आमंत्रित केले जाणार आहे. त्यांच्या अहवालानंतरच याबाबतचे निर्णय घेतले जाणार आहेत.
तुळजाभवानी मंदिराचा कळस ज्या कर्णशिळांवर तोलला गेला आहे त्याचे वजन अधिक झाल्याने मंदिरास धोका निर्माण होऊ शकतो, असे मत राज्य पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी नोंदवले होते. मंदिराच्या भितींला लावण्यात आलेल्या टाईल्स काढून मंदिरास गतवैभव मिळवून देण्यासाठी विविध कामे सुरू आहेत. या कामा दरम्यान कळसाच्या कर्णशिळांना तडे गेल्याचे लक्षात आले होते. हा जुना कळस उतरवून सोन्याचा नवीन कळस चढविला जाईल असे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी सांगितले होते. कळस उतरुन नवा कळस करण्याची कृती विषयी मंदिर समितीमधील काही सदस्यांनी विरोध नाेंदवला होता. या अनुषंगाने बोलताना भोपे पुजारी मंडळींनी विरोध नाेंदवला होता. या अनुषंगाने बोलताना धीरज पाटील म्हणाले, शिळा दुरुस्त करता येतात. आमचा विकासाला विरोध नाही. पण शिळा दुरुस्त करता येतात, असा अहवाल संभाजी महाराजांनी पाठविलेल्या तज्ज्ञ समितीने सुचवला आहे. कळस उतरवला गेला तर देवीची मूर्ती हलवावी लागेल. हे काम करायला दोन वर्षे लागतील. तोपर्यंत कुलधर्म कुलाचाराचे प्रश्न निर्माण होतील. त्यामुळे आहे त्या शिळांची दुरुस्ती करावी आणि मंदिराचे स्वरुप पुरातन ठेवावे.’ प्रशासन आणि मंदिर समितीमधील सदस्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर आता भारतीय पुरातत्व सर्वेक्षण अधिकाऱ्यांना बोलावून त्यांचा अहवाल येत्या १५ दिवसात मिळेल अशी व्यवस्था करू, असे शेलार यांनी म्हटले आहे.