सांगली लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीत पप्पू पास होगा क्या? याचीच उत्सुकता सांगलीकरांना लागली असून शुक्रवारी सांगली-मिरज रस्त्यावरील वखार महामंडळाच्या गोदामात होत आहे. प्रशासनाने मतमोजणीची जय्यत तयारी केली असून निवडणूक निकालानंतर जल्लोष साजरा करीत असताना अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेण्यासाठी पोलीस बंदोबस्त मोठय़ा प्रमाणात वाढविण्यात आला आहे.
सांगली लोकसभा निवडणुकीसाठी महिन्यापूर्वी मतदान झाले असून मतदान यंत्रे वखार महामंडळाच्या गोदामात सशस्त्र पहा-यात ठेवण्यात आली आहेत. उद्या सकाळी ८ वाजता मतमोजणीस सुरुवात होणार असून १७२५ मतदान यंत्रे आहेत. त्यासाठी ९० टेबलची व्यवस्था असून ६६६ कर्मचारी तनात करण्यात आले आहेत. २४ फे-या होणार असून फेरीनिहाय मताधिक्य जाहीर केले जाणार आहे. त्यासाठी मतमोजणी केंद्राच्या बाहेरील बाजूस ध्वनिक्षेपक यंत्रणा बसविण्यात आली आहे.
सांगली लोकसभेसाठी यावेळी १७ उमेदवार रिंगणात असले तरी खरी चुरस काँग्रेसचे प्रतीक पाटील व भारतीय जनता पक्षाचे संजयकाका पाटील यांच्यातच दिसून आली. या निवडणुकीत जित कोणाची होणार याची प्रचंड उत्सुकता सामान्यांना लागली असून निकालावर पजाही लावण्यात आल्या आहेत.

Story img Loader