नगर लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार दिलीप गांधी यांच्या प्रचारासाठी पाथर्डी-शेवगाव विधानसभा मतदारसंघात पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांची सभा घेण्याच्या दृष्टीने जोरदार प्रयत्न सुरू असले तरी मुंडे यांनी मात्र त्याला प्रतिसाद दिला नसल्याचे समजते. त्यामुळेच ही सभा होण्याची शक्यता आता कमीच असल्याचे पक्षाच्या वर्तुळातूनच  सांगण्यात येते.
वंजारी समाजाचे मोठे मतदान असलेल्या पाथर्डी शेवगाव मतदारसंघात मुंडेंचे चांगलेच प्राबल्य आहे. या दोन्ही तालुक्यांत विशेषत: पाथर्डी तालुक्यात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. मुंडेही बीड ही आपली आई आहे, तर पाथर्डी ही आपली मावशी आहे असे जाहीरपणे सांगून पाथर्डीशी असलेली जवळीक कायम जपतात, त्याचाही पाथर्डीकरांना अभिमान आहे. त्यामुळेच येथे मुंडेंची प्रचारसभा व्हावी यासाठी गांधी प्रयत्नशील आहेत. त्याला मुंडेंनी फारसा प्रतिसाद दिला नसल्याचे समजते, मात्र आता सभेची शक्यताच फेटाळून लावण्यात येते. स्वत: मुंडे यांनीच तसे संकेत दिल्याचे समजते. सभेसाठी गांधी यांनी त्यांची भेटही घेतली, मात्र त्याला यश आले नाही.
भाजपच्या वरिष्ठ वर्तुळात मुंडे व गडकरी असे सरळ सरळ दोन गट आहेत. गांधी हे त्यात गडकरी गटाचे मानले जातात. आत्ताही गांधी यांना गडकरी यांच्याच शिफारशीने उमेदवारी मिळाली आहे. त्यांच्या उमेदवारीला मोठा विरोध असतानाही गडकरी यांच्या आग्रहामुळेच थेट पहिल्या यादीतच गांधी यांचा समावेश झाला. या उमेदवारीने मुंडे व गांधी यांच्यामधील दरी अधिकच रुंदावली असताना आता मात्र गांधी यांचे शेवगाव-पाथर्डीमध्ये मुंडे यांची सभा घेण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मात्र मुंडे यांनी अद्यापि त्याला प्रतिसाद दिलेला नाही. गांधी यांच्या प्रचारासाठी येत्या शनिवारी (दि. १२) पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची नगरला सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला तरी मुंडे उपस्थित राहतात की नाही याबाबत साशंकताच व्यक्त होते.
समाजाच्या प्राबल्यामुळेच पाथर्डी-शेवगावमध्ये मुंडे यांच्या सभेला नेहमीच विशेष महत्त्व असते. त्यामुळे गांधी यांचे त्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू असले तरी त्यांना त्यात अद्यापि यश आले नाही. एकीकडे गांधी यांचे हे प्रयत्न सुरू असतानाच ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीत गेलेले भाजपचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष प्रताप ढाकणे हे आता राजळे यांच्या प्रचारात सक्रिय सुरू झाले आहेत. शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात फिरताना त्यांनीही गांधी यांनी मुंडे यांना डावलून उमेदवारी आणल्यामुळेच आपल्याला पक्ष सोडावा लागला, असा प्रचार सुरू केला आहे. गांधी हे मुंडे विरोधी आहेत हेच समाजात बिंबवण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे सांगण्यातच येते. त्यामुळेच पाथर्डी तालुक्यात हा चर्चेचा विषय ठरू लागला आहे. मुंडे यांना सभा शक्य नसेल तर त्यांच्या कन्या पंकजा मुंडे-पालवे यांना या मतदारसंघात आणण्याचा गांधी यांचा प्रयत्न आहे. मात्र त्यातही शिष्टाई करण्यात मुंडे यांनी असमर्थता दर्शवल्याने हा निर्णय तिनेच घ्यावा असे सांगून मुंडे यांनी एका अर्थाने या विषयाला वाटाण्याच्या अक्षताच लावल्या. त्यामुळेच आता या मतदारसंघात मुंडे यांची सभा होणार की नाही याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Story img Loader