लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवानंतर आगामी विधानसभा निवडणुकीतही त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून काँग्रेस पक्षश्रेष्ठी पुरेपूर दक्षता घेत असताना विधानसभा निवडणुकीतील जय-पराजयाची नांदी समजल्या जाणा-या महापालिका महापौरपदाच्या निवडणुकीच्या निकालाविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना मोदी लाटेत दारूण पराभव पत्करावा लागला. यातून स्थानिक काँग्रेसअंतर्गत धुसफूस चव्हाटय़ावर येऊन शिंदे यांचे घनिष्ठ सहकारी विष्णुपंत कोठे यांचे पुत्र महेश कोठे यांनी शिंदे यांच्या विरोधात थेट बंड पुकारत शिवसेनेचा भगवा ध्वज हाती घेतला आहे. महेश कोठे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात शहर मध्य मतदारसंघातून उभे राहण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे.
महापालिकेत गेल्या २५ वर्षांपासून वर्चस्व ठेवून असलेले कोठे यांची रणनीती पाहून सुशीलकुमार शिंदे हे आपल्या कन्या प्रणिती शिंदे यांना कोणत्याही प्रकारचा धोका होऊ नये म्हणून सोलापूरकडे जातीने लक्ष ठेवून आहेत. याच पाश्र्वभूमीवर महापौरपदाची निवडणूक उद्या शनिवारी होत आहे. काँग्रेसने प्रा. सुशीला आबुटे यांना संधी दिली आहे. महापालिकेत १०२ नगरसेवकांपैकी ४४ नगरसेवक काँग्रेसचे तर मित्रपक्ष राष्ट्रवादीचे १६ नगरसेवक आहेत. काँग्रेसमध्ये कोठे यांच्या गटाचे १५ नगरसेवक आहेत. महेश कोठे हे शिवसेनेत गेले असले तरी त्यांना मानणारे १५ नगरसेवक सध्या तरी ‘शांत’ आहेत. पक्षांतर बंदी कायद्याची अडचण असल्यामुळे कोठे गटाचे हे नगरसेवक सध्या तरी सेनेत गेले नाहीत. महापौरपदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी पक्षाच्या सर्व नगरसेवकांना यापूर्वीच व्हिप बजावला आहे. विरोधकांच्या संपर्कात येऊ नयेत म्हणून या सर्व नगरसेवकांना हैदराबादला नेण्यात आले आहे. मात्र हैदराबादच्या सहलीला जाण्यास ४४ पैकी २२ नगरसेवकांनी टाळले आहे. यात बहुसंख्य नगरसेवक कोठे गटाचे आहेत. हैदराबादला न गेलेले हे नगरसेवक आजारपणाचे किंवा अन्य कारण सांगून उद्या महापौरपदाच्या निवडणुकीच्यावेळी पालिका सभागृहात गैरहजर राहिले तर त्याचा फटका सत्ताधारी काँग्रेसला बसू शकतो. त्यामुळे महापौरपदाच्या निवडणुकीत बाजी मारेपर्यंत काँग्रेसच्या गोटात बेचैनीचे वातावरण दिसून येते. याउलट, इकडे विरोधी महायुतीतही सन्नाटाच दिसून येतो. भाजपने नरसूबाई गदवालकर यांना उमेदवारी दिली आहे. महापौरपदाची निवडणूक केवळ बिनविरोध होऊ द्यायची नाही म्हणून महायुतीने आपला उमेदवार उभा केल्याचे बोलले जात असले तरी तेथील हालचालींकडे विशेषत: कोठे गटाच्या हालचालींकडे राजकीय जाणकारांच्या नजरा वळल्या आहेत. महापौरपदाची निवडणूक निर्विघ्न होऊन आगामी विधानसभा निवडणुकीतील विजयाचा मार्ग सुकर ठरण्यासाठी काँग्रेसच्या श्रेष्ठींनी गणरायाला साकडे घातले आहे.
महापौर निवडीची उत्सुकता शिगेला
विधानसभा निवडणुकीतील जय-पराजयाची नांदी समजल्या जाणा-या महापालिका महापौरपदाच्या निवडणुकीच्या निकालाविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
First published on: 06-09-2014 at 04:00 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Curiosity in mayor election of solapur