सोलापूर : सोलापुरात सध्या २५ पाकिस्तानी नागरिक अधिकृतपणे वास्तव्य करीत आहेत. यात दीर्घ मुदतीचा व्हिसा असलेले ११, तर अल्प मुदतीचा व्हिसा असलेल्या १४ नागरिकांचा समावेश आहे. त्यांना पाकिस्तानला परत पाठवण्याची परिस्थिती आहे. परंतु ते सर्वजण सिंधी हिंदूधर्मीय आहेत. त्यामुळे त्यांना परत पाठवण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याशी चर्चा करून व त्यांचे मार्गदर्शन घेऊन पुढील कार्यवाही केली जाईल, अशी माहिती सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.

जम्मू-काश्मीरमध्ये पहेलगाम येथे निरपराध पर्यटकांवर दहशतवाद्यांनी क्रूरपणे केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने पाकिस्तानच्या विरोधात कठोर भूमिका घेत भारतात येऊन राहणाऱ्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना तत्काळ देश सोडून जाण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सोलापुरात वास्तव्य करीत असलेल्या पाकिस्तानी नागरिकांची मोजदाद पोलीस प्रशासनाने केली आहे. त्याचा संक्षिप्त तपशील देताना पालकमंत्री गोरे म्हणाले, या १४ सिंधी नागरिकांना परत पाठविण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करून पुढील कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.