सिंचन प्रकल्पात कोटय़वधींचा भ्रष्टाचार करणारे मंत्री आणखी सहा महिन्यांनंतर तुरुंगात दिसतील. महाराष्ट्रात भ्रष्ट सत्ताधारी व मतलबी विरोधकांची सांगड आहे. ‘आपण दोघे भाऊ भाऊ, मिळून मिसळून वाटून खाऊ’ असेच त्यांचे चालले आहे, अशी जहरी टीका शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी केली.
गंगाखेड येथे शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार हरिभाऊ खांडवीकर होते.  भाषणात पाटील यांनी सिंचन घोटाळ्याच्या अनुषंगाने अजित पवार, सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली. सरकारने सिंचनाच्या प्रश्नावर काढलेली श्वेतपत्रिका हा सर्वात मोठा विनोद असून या श्वेतपत्रिकेबाबत कोणाचेही समाधान झालेले नाही. सध्याचे जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांचा कारभार अजूनही अजित पवार हेच पाहतात, अशी टीकाही त्यांनी केली. महाराष्ट्रात सत्ताधाऱ्यांचे भ्रष्ट राजकारण चाललेले असताना शिवसेना-भाजप हा जबाबदार विरोधी पक्षाची भूमिका पार पाडत नाही. ‘तुमच्या चार फायली काढा, आमच्या दोन फायली काढा’ या पद्धतीने सगळे चालले आहे. सिंचन घोटाळ्यात भ्रष्टाचार करून ज्यांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना झळ पोहोचवली अशांना जनता कधीही माफ करणार नाही. गोरगरीब शेतकऱ्यांचे पाणी व पैसे चोरणाऱ्यांना चापकाने फोडून काढले पाहिजे, अशी टीकाही पाटील यांनी केली. या प्रसंगी त्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या नागपूर येथे १९ डिसेंबरला होणाऱ्या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन केले.

Story img Loader